
खेळताना विद्युत जनित्राजवळ गेल्याने शॉक लागून एका चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. ललिता भीमराव मडावी (4) असं या मुलीचं नाव आहे.
ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या लांबोरी गावात घडली आहे. ललिता मडावी ही मुलगी तिच्या घराच्या अंगणात खेळत होती. तिच्या घरा शेजारीत विद्युत जनित्र आहे. या जनित्राचं दार उघडं होतं. खेळण्याच्या नादात ललिता जनित्राजवळ गेली.
तिथे जनित्राला तिच्या हाताचा स्पर्श झाला. त्यामुळे विद्युत प्रवाहाचा जबरदस्त धक्का बसून ती जमिनीवर कोसळली. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच ललिताचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.





























































