आमदार खरेदीचा अनुभव असणारे ‘खोके सरकार’चे प्रतिनिधी लोकशाहीचा चौथा स्तंभ खरेदी करू पाहताहेत!

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात ते आपल्याविरोधात बातम्या छापल्या जाऊ नये म्हणून पत्रकारांना चहा पाजण्याचा, ढाब्यावर जेवायला नेण्याचा सल्ला देत आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

आमदार खरेदीचा दांडगा अनुभव असलेले खोके सरकारचे लोकप्रतिनिधी आता लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला खरेदी करू पाहत आहेत. भाजपविरोधात बातम्या छापू नये म्हणून पत्रकारांना चहा पाजण्याचा सल्ला देणाऱ्या बावनकुळेंना पत्रकार मूर्ख वाटतात का? असे ट्विट महाराष्ट्र काँग्रेसने केले आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला.

येड्या सरकारचे लोकप्रतिनिधी आता लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला खरेदी करू पाहत आहेत! सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं काम पत्रकार करत असतात परंतु हा आवाज दाबण्यासाठी पत्रकारांना चिरीमिरीचे आमिष देण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात ही अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर जेवायला न्या; विरोधामध्ये काही छापून येता कामा नये! – चंद्रशेखर बावनकुळे

सुप्रिया सुळे यांची टीका

विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही‌. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात ही अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. ज्याअर्थी बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले.

पूरग्रस्ताला फडणवीसांनी खेचले, धक्का दिला! नागपुरात संतापाचा पूर, उपमुख्यमंत्र्यांना रोखले