
सामना ऑनलाईन । मुंबई
विकेन्ड सेलिब्रेशन मूडमध्ये तुम्ही जर घरबसल्या फोन करून दारू मागवण्याच्या तयारीत असाल तर जरा सावध राहा. कारण तुमची फसवणूक होऊ शकते. सध्या वेबसाईटवरील वाईन शॉपच्या फोन नंबरमध्ये बदल करून फसवणूक करणाऱ्या भुरट्यांनी मुंबईत उच्छाद मांडला आहे. मुंबईतल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये घरपोच दारू मागवल्याने फसवणूक झाल्याच्या सहा तक्रारी दाखल झाल्या आहेत.
मुंबई पोलिसांकडे तक्रार आलेल्या वांद्रे येथील रहिवासी निरज कोल्लाह यांनी जेव्हा घरपोच दारू मागवण्यासाठी वेबसाईटवरील वाईनशॉपच्या नंबरवर फोन केला होता. त्यावेळी त्यांना ई- वॉलेटने दारूचे पेमेंट करायला सांगितले. पेमंट केल्यावर बराच वेळ वाट बघूनही दारू घरपोच होत नसल्याने त्यांनी संबंधित नंबरचे लोकेशन तपासले असता तो नंबर राजस्थानमध्ये असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे घरपोच दारू मागवल्यामुळे निरज यांना 1 हजार 300 रुपयांचा गंडा बसला. याच पद्धतीने चेंबुर येथील एका ग्राहकाची देखील अशाच पद्दतीने फसवणूक झाली आहे. मुंबईत अशा प्रकारची फसवणूक झाल्याच्या तक्रारी वांद्रे, खार, सांताक्रुज, घाटकोपर या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तपास केल्यावर वाईनशॉपने वेबसाईटवर दिलेला फोन नंबर बदलून अशाप्रकारची फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. विशेषत: जेव्हा वेबसाईचटवर कोणतेही बदल होतात त्यावेळी संबंधित दुकानाच्या मॅनेजर किंवा कर्मचाऱ्यांना त्याबातचा मेसेज फोनवर येत असतो. मात्र कधीकधी मेसेज तपासण्याची तसदी न घेतल्यामुळेही अशाप्रकारची फसवणूक होते. भुरटेगिरीच्या या नव्या प्रकारामुळे ग्राहकांबरोबरच दुकानदारांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र वाईन मर्चंट असोशिएशनने राज्यभारातल्या वाईन शॉप चालकांना वेबसाईटवरील त्यांचे फोन नंबर वेळच्यावेळी तपासण्याच्या सूचना केल्या आहेत.



























































