भुजबळांना बाप्पा पावला! महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून झाली निर्दोष मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला. आरोपींविरोधात कोणतेही सबळ पुरावे नाहीत असे स्पष्ट करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) न्यायालयाने आज छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली. छगन भुजबळ, मुलगा पंकज, पुतण्या समीरसह पाच जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले. आपल्यावर लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची विनंती भुजबळ यांनी मुंबई सत्र न्यायालयाला केली होती.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्याविरोधात एसीबीकडे कोणतेही पुरावे नाहीत असा दावा करत भुजबळ यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर न्यायाधीश एच. एस. साठबाई यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी भुजबळ यांच्या वतीने ज्येष्ठ कौन्सिल प्रसाद डाकेफाळकर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत आणि चुकीच्या अनुमानांवर आधारित आहेत. खटला चालवण्यासाठी 2016 साली सादर करण्यात आलेल्या हजारो पानांच्या आरोपपत्रात आपल्या अशिलांविरुद्ध पुरेसे पुरावे नाहीत. न्यायाधीशांनी हा युक्तिवाद ग्राह्य धरत भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली. त्यांच्यासह मुलगा पंकज, पुतण्या समीर यांचा अर्जही मंजूर करत न्यायालयाने याच प्रकरणातील अन्य आरोपी तन्वीर शेख, इरम शेख, संजय जोशी आणि गीता जोशी यांना दोषमुक्त केले.

एसीबीचे म्हणणे काय?

भुजबळ उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री असताना महाराष्ट्र सदनच्या नूतनीकरणासाठी 2005 ते 2006 सालादरम्यान कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता चमणकर या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती. एसीबीच्या म्हणण्यानुसार कंत्राटदाराला 80 टक्के नफा झाला होता. सरकारच्या नियमानुसार कंत्राटदाराला 20 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावता येत नाही. महाराष्ट्र सदनाची अंदाजित रक्कम 13.5 कोटी इतकी होती. मात्र ती रक्कम नंतर 50 कोटींवर पोहोचली व त्यातील 13.5 कोटी इतकी रक्कम भुजबळ यांना कंत्राटदारामार्फत देण्यात आली.

सत्य परेशान होता है, पराजित नहीं! – छगन भुजबळ

काही लोकांनी त्रासच द्यायचे ठरवले होते. आम्ही त्याच वेळी म्हटले होते की, सत्य परेशान होता है, पराजित नहीं. एका पैशाचाही घोटाळा झाला नाही हे आम्ही वारंवार सांगत होतो. तेच आम्ही कोर्टात सांगितले. आज आम्हाला त्या केसमधून निर्दोष मुक्त केले आहे, आम्ही विनम्रपणे हा निकाल स्वीकार करत आहोत. आमची कुणावरही तक्रार नाही. माझ्यावर पक्षाने, शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे निकालानंतर छगन भुजबळ म्हणाले.