
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
ज्या नवीन महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातील भ्रष्टाचार प्रकरणामुळे तुरुंगवास भोगावा लागला त्याच नवीन महाराष्ट्र सदनात जामिनावर सुटल्यानंतर आज दुपारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे प्रकटले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ हेही होते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आज भाजप सरकारविरोधात आंदोलन करीत असताना आणि राजधानीत भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली असताना भुजबळ काकापुतण्यांनी दिल्लीचे ‘टायमिंग’ साधल्याबद्दल राजकीय वर्तुळांत भुवया उंचावल्या आहेत.
भुजबळ सार्वजनिक बांधकाममंत्री असताना राजधानीत नवीन महाराष्ट्र सदनाची भव्यदिव्य वास्तू उभारली गेली. वास्तविक नवीन महाराष्ट्र सदनाची वास्तू ही इतर राज्यांच्या कोणत्याही गेस्ट हाऊसपेक्षा कैकपटींनी सरस आहे. मात्र हे सदन सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आणि त्यानंतर तर भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन त्यांना व समीर भुजबळ यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.

























































