3 महिला नक्षलवाद्यांसह चौघांचा खात्मा, सुरक्षा दलाची मोठी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, धमतरी

छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली ज्यात जवानांनी 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या नक्षलवाद्यांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. मेचका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही चकमक झाली असून जवानांना या नक्षलवाद्यांकडे असलेला शस्त्रसाठाही सापडला आहे.

सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. छत्तीसगडमधील नक्षलविरोधी अभियानाचे उप पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी या चकमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मेचकाच्या जंगलात अजूनही काही नक्षलवादी लपून बसले असून इथे अजूनही चकमक सुरू आहे.  पोलिसांना नक्षलवादी मोठा हल्ला करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी  शनिवारी सकाळी या जंगलात शोध मोहिमेला सुरूवात केली होती. यावेळी दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. याला दिलेल्या प्रतिउत्तरात पोलिसांनी या नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.