चॅलेंज व्हिडीओ यूट्यूबला पडणार महागात; अधिकाऱ्याला समन्स, आई-मुलांसंदर्भातील ‘अश्लिल’ कंटेटबद्दल कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने YouTube इंडियाच्या सरकारी व्यवहार आणि सार्वजनिक धोरण प्रमुखांना 15 जानेवारी रोजी अशा चॅनेलच्या यादीसह वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यास सांगितले आहे. आई आणि मुलांचा समावेश असलेल्या अयोग्य कंटेटबद्दल चिंता व्यक्त होत आहे, यासंदर्भात चौकशी करण्यासाठी समन्स धाडण्यात आले आहेत.

यूट्यूबचे हिंदुस्थानातील सरकारी व्यवहार आणि सार्वजनिक धोरण प्रमुख मीरा चॅट यांना लिहिलेल्या पत्रात, NCPCR प्रमुख प्रियांक कानूनगो यांनी म्हटलं आहे की, आयोगानं YouTube चॅनेलवर आई आणि मुलांसह चिंताजनक वाढ होत असलेल्या अशोभनीय चॅलेंज व्हिडीओ कंटेट ट्रेंडची दखल घेतली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘चॅलेंज व्हिडीओ’मध्ये आई आणि मुलांमध्ये चुंबन, आई आणि किशोरवयीन मुलांमधील अश्लील कृत्ये दाखवण्यात आली होती.

‘यूट्यूबवरील अनेक चॅलेंज व्हिडिओ ज्यामध्ये आई आणि मुलं आहेत ते लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायदा, 2012 चे उल्लंघन करतात’, अशी माहिती इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना कानूनगो यांनी दिली.

‘YouTube ला यावर खुलासा करावा लागेल. असे व्हिडीओ हटवावे लागतील. गुन्हेगारांना तुरुंगात जावे लागेल. अशा व्हिडीओंना प्रसारित करणं म्हणजे पॉर्न विकण्यासारखंच आहे. ज्या प्लॅटफॉर्मवर मुलांचे लैंगिक शोषण झालेले व्हिडीओ दाखवले जातात, त्यांना तुरुंगात जावं लागेल’, असं ते पुढे म्हणाले.