चीनची दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
china-flag-new

सामना ऑनलाईन। पेईचिंग

चीनने गेल्या चार वर्षांत दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करत 13 हजार दहशतवाद्यांना अटक केली. तर शेकडो दहशतवादी टोळय़ांचा खात्मा केला. शिनजियांग या मुस्लीम भागात नजरकैद कॅम्प आणि मुस्लिमांवर होणाऱया सैन्य अत्याचारावरून टीका झाल्यावर चीनने एक अहवाल जाहीर करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, हिंदुस्थानमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱया ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याबाबत चीनने वेळकाढूपणाची भूमिका घेतली आहे.

अहवालात म्हटले आहे की, मुस्लीम कट्टरवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकारकडून कठोर पावले उचलण्यात आली. मात्र, त्यांच्या मुसक्या आवळताना नेमकी कोणती कठोर कारवाई केली याची माहिती अहवालात दिली नाही.

10 लाख मुस्लीम नजरकैदेत

उजगर आणि इतर मुस्लीम समूहातील जवळजवळ 10 लाख जणांना सैन्याने नजरकैदेत ठेवले आहे. यावरून जगभरातून चीनवर टीका होत आहे. मात्र, त्यावर दहशतवादाला आळा घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यात मुस्लिमांना नजरकैदेत ठेवले नसून त्यांच्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आल्याचे चीनने म्हटले आहे. दरम्यान, शिनजियांग भागात मुस्लिमांनी चीनपासून स्वतंत्र होण्यासाठी बंड केले आहे. त्यासाठी त्यांनी दहशतवादाचा मार्ग अवलंबला असून त्यांचे परदेशी दहशतवादी संघटनांशी साटेलोटे आहे. मात्र, हे सगळे दावे करताना त्याच्या पुष्टीसाठी कोणतेही पुरावे चीन सरकारने दिलेले नाहीत.

मुस्लीम असणे हाच अपराध
शिनजियांग भागात सर्वसामान्यांना जायला बंदी आहे. त्यामुळे तिथले वास्तव नेमके काय आहे, याचा थांगपत्ता अजूनही कोणाला लागलेला नाही. मूळचे चिनी पण आता परदेशात राहणाऱया सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, या भागात केवळ मुस्लीम म्हणून आपली ओळख जाहीर करणे हाच अपराध आहे.