
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याच्या हत्येमुळे हिंदुस्थान आणि कॅनडातील (Canada vs India crisis) संबंध सध्या ताणलेले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्र्रुडो यांनी निज्जरच्या हत्येमध्ये हिंदुस्थानी गुप्तचर संस्थांचा हात असल्याचा आरोप केला. यामुळे दोन्ही देशांमध्ये कटुता आली असून हा मुद्दा सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजतोय. हिंदुस्थानने कॅनडाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याच दरम्यान चीनच्या एका महिला पत्रकाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
निज्जरच्या हत्येमागे चीनचा हात असून हिंदुस्थान आणि पश्चिम देशांमध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी चीनने हा डाव खेळला. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची ही रणनीती असून त्याअंतर्गतच हा कट रचण्यात आला होता, असा दावा मुक्त ब्लॉगर जेनिफर झेन्ग (Jennifer Zeng) यांनी केला आहे.
जेनिफर यांचा जन्म चीनमधला असून त्या उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या आहेत. त्या पत्रकार असून सध्या अमेरिकेमध्ये राहतात. मात्र दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येबाबत त्यांनी केलेल्या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली असून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
जेनिफर यांनी एक व्हिडीओ आपल्या ट्विटर (एक्स) अकाऊंटवरून शेअर केला आहे. या त्या म्हणतात, चायनीज कम्युनिस्ट पार्टी अर्थात सीसीपीच्या एजंटचा निज्जरच्या हत्येत सहभाग आहे. त्यांनीच याचा कट रचला. हिंदुस्थान आणि पश्चिम देशांमध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी हा प्लॅन आखला गेला. यासाठी सीसीपी मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटीने एक अधिकारी अमेरिकेतील सिएटल येथे पाठवला होता.
Exclusive: Today, shocking revelations about the assassination of the #Sikh leader, #HardeepSinghNijjar in #Canada, have emerged from within the #CCP.
It is alleged that the assassination was carried out by CCP agents.
The purpose was to frame #India, creating discord between… pic.twitter.com/aweBigR1bf— Inconvenient Truths by Jennifer Zeng 曾錚真言 (@jenniferzeng97) October 8, 2023
अमेरिकेत एक गुप्त बैठक झाली आणि त्यात निज्जरच्या हत्येचा प्लॅन रचण्यात आला. यासाठी सीसीपी एजंटने हिंदुस्थानी बोलतात तशी इंग्रजीही शिकली. त्यानंतर 18 जूनला सीसीपी एजंटने गोळ्या घालून निज्जरची हत्या केली. त्यानंतर हत्येचे पुरावे नष्ट केले आणि एजंट फरार झाला. त्याने आपले कपडे आणि हत्यारही जाळून नष्ट केले आणि दुसऱ्याच दिवशी कॅनडा सोडले, असा दावा जेनिफर यांनी केला.




























































