चिन्यांनी घेतला नेपाळच्या सीमेलगत ताबा, गुप्तचर संस्थांची माहिती

हिंदुस्थानच्या सीमाभागात तणाव निर्माण केल्यानंतर आता चीनने नवी रणनीती आखली आहे. हिंदुस्थान विरुद्ध कुरापती करण्यासाठी चीनने आता नेपाळच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नेपाळच्या माध्यमातून चीन हिंदुस्थानच्या हालचालींवर देखरेख ठेवण्याचं काम करत आहे. त्यामुळे चीनने नेपाळ सीमेलगतच्या सात जिल्ह्यांवर अवैध पद्धतीने ताबा मिळवला आहे. चीनच्या या हालचालींनंतर हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन वेगवान हालचाली करत असून तो हिंदुस्थानच्या दिशने पुढे येत आहे. त्यासाठी नेपाळ सीमेवर भुयारं खोदण्यात येत आहेत. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना माहीत असूनही चीनने ही घुसखोरी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नेपाळचे जे जिल्हे चीनने ताब्यात घेतले आहेत त्यात डोलखा, गोरखा, दारचुला, हमला, सिंधुपालचौक, संखुवासभा आणि रसुवा यांचा समावेश आहे. चीनने डोलखा येथे नेपाळच्या दिशेने आपली सीमा जवळपास दीड किलोमीटर पर्यंत वाढवली आहे. तसंच डोलखा येथील कोरलंग, गोरखा जिल्ह्यातील काही ठिकाणांना स्थानांतरित केलं आहे.

नेपाळच्या कृषी मंत्रालयानेही चीनच्या या अवैध घुसखोरीवर प्रकाशझोत टाकला असून मंत्रालयाने चार जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या 11 प्रदेशांवर चिनी घुसखोरी झाल्याची सूचना दिली आहे. यातील बहुतांश क्षेत्र ही जलग्रहण क्षेत्र आहेत, जिथे नद्यांमुळे जमीन विभागली गेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या