माजी उप-पंतप्रधानांनी बलात्कार केला, 2 ग्रॅण्डस्लॅम विजेत्या टेनिसपटूच्या आरोपांनी उडाली खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनची अव्वल महिला टेनिस खेळाडू पेंग शुआई हिने केलेल्या एका आरोपामध्ये चीनमध्ये खळबळ उडाली आहे. पेंग शुआई हिने देशातील एका वरिष्ठ नेत्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. 35 वर्षीय पेंग शुआई हिने माजी उप-पंतप्रधान झांग गाओली यांच्यावर हे आरोप केले आहेत. याबाबत पेंग हिने चीनमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वाईबोवर एक पोस्ट शेअर केली होती. अर्थात काही वेळातच तिने ही पोस्ट उडवली. मात्र तोपर्यंत या पोस्टचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते.

पेंग शुआई हिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये माजी उप-पंतप्रधान झांग यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. सुरुवातीला त्यांनी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले, मात्र यानंतर आम्ही सहमतीने लैंगिक संबंध ठेवू लागलो, असेही पेंग हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

तीन वर्षांपूर्वी बिजिंगमध्ये झांग यांनी टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते. यानंतर झांग हे पेंग शुआई हिला एका खोलीत घेऊन गेले आणि तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. झांग यांनी जबरदस्ती केल्याचा कोणताही पुरावा आपल्याजवळ नव्हता, असे पेंग हिने सांगितले. त्यामुळे आपण तणावात होतो, असेही पेंग हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

दरम्यान, झांग गाओली हे चीनचे राष्ट्रपती शी झिनपिंग यांच्या पहिल्या कार्यकाळात (2012 ते 2017) सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सात सदस्यीय पोलित ब्यूरो स्थायी समितीचे सदस्य होते. 2018 मध्ये ते उप-पंतप्रधान असताना निवृत्त झाले होते. पेंग शुआई हिने केलेल्या आरोपावर झांग यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच चीनच्या स्टेट काउन्सिल इन्फॉर्मेशन ऑफिसकडूनही यावर प्रतिक्रिया आलेली नाही.

दोन ग्रॅण्डस्लॅम जिंकलीय पेंग

पेंग शुआई ही चीनची अव्वल महिला टेनिसपटू आहे. महिला दुहेरीमध्ये ती आघाडीची खेळाडू आहे. तिच्या नावावर दोन ग्रॅण्डस्लॅम आहेत. 2013 मध्ये तिने विम्बल्डन आणि 2014 मध्ये फ्रेंच ओपनचे महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. यासह तिच्या नावावर अनेक स्पर्धांचे विजेतेपद आहे.