चिपळूण नगरपालिकेने शहरात कोविड केअर सेंटर उभारावे – बाळा कदम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. चिपळूण शहरात देखील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे परिसरातील शासकीय आणि खासगी कोविड सेंटरमध्ये रुग्णाला दाखल करण्याकरिता बेड उपलब्ध होत नाहीत. यासाठी चिपळूण नगरपालिकेने शहरात स्वतःचे कोविड केअर सेंटर उभारावे. त्यासाठी गरज लागल्यास 58/2 कलमाचा वापर करून निधीची तरतूद करावी. याकरिता सामाजिक संस्थांचीही मदत घ्यावी, अशी मागणी चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोना प्रसाराचा वेग प्रचंड आहे. दररोज दुपटीने वाढणारी रुग्णसंख्या पाहता चिपळूण शहरात सामूहिक संसर्गाची भीती आहे. दुर्दैवाने सामूहिक संसर्गाला सुरुवात झाली, तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच तयारी करणे आवश्यक असल्याचे बाळा कदम यांनी म्हटले आहे.

चिपळूण नगरपालिकेकडे स्वतःची आरोग्य यंत्रणा आहे तसेच नगरपालिका मालकीच्या इमारती आणि जागा देखील आहेत. त्यामुळे पुढील धोका ओळखून पालिकेने स्वतःचे प्रशस्त असे कोविड सेंटर उभारण्याची अत्यंत आवश्यकता आहे. किमान 100 ते 150 बेडचे कोविड केअर सेंटर शहरात सुरू करावे जेणेकरून शहरातील कोरोना बधितांवर येथेच लवकर उपचार होतील आणि आजूबाजूच्या शासकीय तसेच खाजगी कोविड सेंटरवरचा ताण कमी होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

चिपळूणमधील कामथे कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या जास्त आहे. तिथे बेड उपलब्ध नाहीत तसेच शहरातील लाईफकेअर आणि अन्य खासगी कोविड सेंटरचीदेखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे चिपळूण पालिकेतील लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे बाळा कदम यांचे म्हणणे आहे.