
कधी गुलाबी रस्ता तर कधी हिरवा पाऊस… हे कमी म्हणून की काय नाल्यातून वाहणारे निळे, दुधाळ केमिकलमिश्रित सांडपाणी… यामुळे डोंबिवलीकर नागरिक हैराण झाले असताना आज एमआयडीसी परिसरातील एका नाल्यात सप्तरंगी केमिकलमिश्रित पाणी वाहत असल्याचा प्रकार आढळून आला. नाल्यातील उग्र वासामुळे मळमळणे, डोळे चुरचुरणे, श्वसनाच्या त्रासाला रहिवाशांना सामोरे जावे लागते.
कधी हिरवा पाऊस तर कधी गुलाबी-निळा रस्ता… कधी उग्र दर्प तर कधी रस्त्यावर वाहणारे केमिकल… प्रदूषणाच्या अशा विविध प्रकारांनी डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्या कायम चर्चेत राहतात. आज सकाळी एमआयडीसी फेज-2 परिसरातून वाहणाऱ्या एका मोठ्या नाल्यातील पाण्याचा रंग अचानक रंगीबेरंगी झाला. या सप्तरंगी नाल्यामुळे काही वेळातच आजूबाजूला उग्र दर्प येऊ लागला. लोकांना डोळे चुरचुणे, मळमळणे, श्वसनाचा त्रास होऊ लागला.
चेंबर लिकेज
स्थानिकांनी नाल्याची माहिती एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला देताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कोणत्या कंपनीने नाल्यात केमिकल सोडले याची माहिती घेतली जात आहे. एखाद्या कंपनीच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबरमध्ये लिकेज झाल्याने नाल्यात थेट केमिकलमिश्रित सांडपाणी मिसळल्याची चर्चा आहे.
























































