नगर शहराला पावसाने झोडपले; रस्ते जलमय

वादळी वाऱयासह आलेल्या पावसाने आज दुपारी नगर शहराला झोडपून काढले. या पावसामुळे शहरासह उपनगरामध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये पाणी साचलेले दिसून आले. तब्बल एक तास चाललेल्या पावसामुळे नगरचे रस्ते जलमय झाले होते.

नगर जिह्यामध्ये दोन दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर आज दुपारी नगर शहरामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले. पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. घरी जाताना अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी वाहने अडकून पडली होती. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती.

नगर शहरात पडलेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांमधील वीज गायब झाली होती. एक तासभर वीज आलीच नव्हती. काही ठिकाणी किरकोळ प्रमाणामध्ये झाडे पडल्याच्या घटना घडल्या. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळे वाहने अडकून पडली होती. वाहनचालकांना यातून कसाबसा मार्ग काढून बाहेर पडावे लागले. शहरातील दिल्लीगेट, नवी पेठ, नालेगाव यांसह विविध भागांमध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये पाणी साचलेले दिसून आले. शहरातील उपनगरांमध्ये केडगाव, भिंगार आदी परिसरात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला.