
वनक्षेत्रातील जाचक अटींमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील नागरी सुविधांची कामे रखडली आहेत. ही कामे लवकरात लवकर मार्गी लागावीत यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाने वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांची भेट घेतली असता उद्यान परिसरातील नागरी सुविधांच्या कामांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असे वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील वनक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. वनक्षेत्रातील जाचक अटींमुळे तिथे राहणाऱया आदिवासी पाडय़ातील व वनक्षेत्रालगत राहणाऱया झोपडपट्टीतील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेना विधिमंडळ पक्ष, मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू व विधान परिषद आमदार विलास पोतनीस यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना शिष्टमंडळाने वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जी. मल्लिकार्जुन यांची भेट घेऊन चर्चा केली.
त्यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील नागरी सुविधेच्या सर्व प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही वनक्षेत्र अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या शिष्टमंडळात शिवसेना विभागप्रमुख उदेश पाटेकर, माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, माधुरी भोईर, उपविभागप्रमुख योगेश भोईर, विधानसभा संघटक अशोक म्हामुणकर, संजय सिंघण यांचा समावेश होता. यावेळी वनक्षेत्रपाल तुळशी, नरेंद्र मुठे उपस्थित होते.






























































