नांदेडमध्ये किन्नरांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी; एकमेकांच्या हद्दीत पैसे मागण्यावरून वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड मध्ये किन्नरांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एकमेकांच्या हद्दीत पैसे मागण्याच्या कारणावरून हा राडा झाला.नांदेड मधील किन्नरांची गुरु अर्चना देवकर हिचे किन्नर शिष्य हिंगोली जिल्ह्यात पैसे मागायला जात होते.त्यांना हिंगोली येथील किन्नरांची गुरु गौरी बकस हिने मज्जाव केला. हिंगोलीत पैसे मागणाऱ्या नांदेडच्या दोन किन्नरांचे केस कापण्यात आले असा आरोप आहे.

या घटनेनंतर हिंगोली आणि नांदेडच्या किन्नरांमध्ये तडजोडीसाठी बैठक बोलावण्यात आली.नांदेड शहरातील लालवाडी भागात ही बैठक होती. मात्र बैठकीत वाद होऊन किन्नराच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.नंतर नांदेड येथील किन्नरांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले. तक्रारी देण्याचे ठरले मात्र दोन्ही गटांनी चर्चा करून समेट घडवून आणला. कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिस निरीक्षक राजेश पुरी यांनी सांगितले.