बसस्थानक,रस्ते,फुटपाथवर निर्जंतुकीकरण; रत्नागिरी नगर परिषदेचा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेने प्रभावी उपाययोजना सुरु केल्या आहेत. आज जनता कर्फ्यूच्या दिवशी दुपारी बारा वाजता नगरपरिषदेने क्लोरिन आणि अन्य कीटकनाशकांचे मिश्रण करून रत्नागिरी शहरातील मुख्य बसस्थानकसह आठवडाबाजार आणि शहरातील अन्य परिसरात फवारणी करून निर्जंतुकीकरण केले.

नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. रत्नागिरी शहर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. जिल्ह्यातून आणि बाहेरील जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने रत्नागिरीत येतात अशावेळी रत्नागिरीकरांनी जागरूक रहाणे गरजेचे आहे. त्यामुळेच नगरपरिषदेने आज शहरातील मुख्य बसस्थानकात सर्वप्रथम फवारणी केली त्यानंतर एस.टी.स्टॅण्ड परिसरातील रस्ते, फुटपाथवर फवारणी करत हा बंब पुढे रवाना झाला. शासनाने दिवालिया सूचनांचे पालन करत क्लोरिन आणि अन्य किटकनाशकांचे मिश्रण करण्यात आले आहे. नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी युध्द पातळीवर काम करत आहेत. यापूर्वी नगरपरिषदेने शहरात दहा हजार मास्क मोफत वाटले. मास्कचा तुटवडा असल्याने ते मास्क महिला बचत गटांकडून बनवून घेण्यात आले. पंधरा नवीन फ़ॉग मशीन आणून शहरात धुरीकरण करून निर्जंतुकीकरण सुरु आहे.