
सामना ऑनलाईन, नागपूर
सिंधुदुर्ग जिह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्दय़ावरून कणकवलीचे आमदार नीतेश राणे व गृह राज्यमंत्री आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यात विधानसभेत चांगलीच जुगलबंदी रंगली. गृह राज्यमंत्र्यांच्या सिंधुदुर्गात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप नीतेश राणे यांनी करताच पूर्वी सिंधुदुर्गात दिवसाढवळय़ा खून व्हायचे, पण आता खून होत नाहीत असे सांगत केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्याचवेळेस खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून आले आणि गृह राज्यमंत्र्यांचे काम उत्तम असल्याचे सांगत केसरकर यांचे कौतुक केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या निरुखे गावातील माजी सरपंच रामदास करंदीकर यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याचा प्रश्न आमदार नीतेश राणे यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत उपस्थित केला. त्यावेळी बोलताना नीतेश राणे यांनी आपला मोर्चा सभागृहात उपस्थित असलेल्या केसरकर यांच्याकडे वळवला. गृह राज्यमंत्री हे सिंधुदुर्ग जिह्याचे आहेत. त्यांचा धाक नसल्याने किंवा जिह्याकडे लक्ष नसल्याने दरोडेखोरांची हिंमत वाढली आहे अशी टीका राणे यांनी केली.
या टीकेला केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले. जिह्यात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे म्हणून दरोडेखोरांना अटक झाली. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिह्यात सर्वात कमी ‘क्राइम रेट’ आहे. पूर्वी सिंधुदुर्गात दिवसाढवळय़ा खून व्हायचे. आता तसे होत नाही. गुन्हेगारांना आम्ही धाक बसवला आहे, असे केसरकर म्हणाले. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात उभे राहिले. गृह राज्यमंत्री पालकमंत्री आहेत म्हणून कोणी दरोडे घालत नाहीत. त्यांचे काम उत्तम सुरू आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
निरुखे दरोडा प्रकरणात तथाकथित पथकाला अटक करण्यात आली आहे. या गुह्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडून कोणती चूक झाली किंवा कमतरता राहिली असेल तर त्यांची चौकशी केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. पोलीस चौकशीत कमतरता असेल तर हे प्रकरण चौकशीसाठी सीआयडीकडे सोपवले जाईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.




























































