
गद्दारीचा टिळा कपाळी लावून फिरणारे मुख्यमंत्री मिंधे तसेच त्यांच्या टोळभैरवांनी आता रिकाम्या खुर्च्यांची चांगलीच धास्ती घेतली आहे. ढोकी येथे ‘शिवसंकल्प’ च्या निमित्ताने आयोजित सभेकडे लोकांनी पाठ फिरवली. निघून जाणार्या लोकांचे फोटो काढणार्या पत्रकाराला ‘खेकडा’ फेम मंत्री तानाजी सावंत यांच्या गुंडांनी दमदाटी केली, त्याचा मोबाईलही हिसकावून घेतला. मात्र इतर पत्रकारांनी आवाज उठवताच हे गुंड पाठीला पाय लावून पळाले.
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे तेरणा साखर कारखान्याच्या परिसरात मिंध्यांच्या शिवसंकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांचे भयानक रटाळ भाषण सुरू होताच खुर्च्या रिकाम्या व्हायला सुरुवात झाली. पत्रकार किशोर माळी हे निघून जाणार्या लोकांचे मोबाईलमध्ये फोटो काढत असतानाच मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. हा प्रकार पाहून इतर पत्रकारांनी तेथे धाव घेतली. सगळेच पत्रकार आल्याचे पाहून या कार्यकर्त्यांनी मोबाईल टाकून देत पळ काढला.
महिला पदाधिकार्यांनी पदर पसरला…
‘शिवसंकल्प’ अभियानासाठी लाभार्थ्यांना आमिष दाखवून बोलावण्यात आले होते. यात महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांचे रडगाणे सुरू होताच या महिला बाहेर पडण्यासाठी उठल्या. महिला उठल्याचे पाहून मिंधे गटाच्या महिला पदाधिकार्यांनी अक्षरश: पदर पसरून ‘जागेवर बसा’ अशी मनधरणी केली. परंतु ही विनवणी धुडकावून अनेक महिलांनी सभास्थळ सोडले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना लोक निघून जात होते. मी त्याचे चित्रीकरण करण्यासाठी जात असताना पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी रिकाम्या खुर्च्या, निघून जाणारे लोक यांचे चित्रीकरण करायचे नाही, असे म्हणत मोबाईल हिसकावून घेतला आणि दमदाटी केली. – किशोर माळी, पत्रकार

























































