
कोविडच्या मुकाबल्यासाठी महाराष्ट्राला रेमडेसिवीर व ऑक्सिजनची गरज असून, पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा. परदेशातून थेट लस आयात करण्याची परवानगी राज्यांना देण्याबाबत विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविडचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सद्य परिस्थितीची माहिती दिली. रुग्णांच्या उपचारासाठी मोठय़ा प्रमाणावर निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका यांची देखील मदत घेण्यात येत आहे, रुग्णांस तात्काळ योग्य ते उपचार सुरू व्हावेत म्हणून टेलीमेडिसिन व टेली आयसीयूवर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
1100 व्हेंटिलेटर्स द्या
राज्यात सध्या 76 हजार 300 ऑक्सिजन बेड्स, तर 25,000 पेक्षा अधिक आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र शासनाने 13,000 जम्बो सिलेंडर व सुमारे 1100 व्हेंटीलेटर्स उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. महाराष्ट्राला दररोज रेमडेसिवीरच्या 70 हजार व्हायल्सची गरज आहे. मात्र सध्या दररोज 27 हजार इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. रेमडेसिवीर अधिक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरेसा पुरवठा केला जावा. परदेशातून रेमडेसिवीर आयात करायला परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली. रेमडेसिवीर व्यतिरिक्त इतर आवश्यक औषधांचा देखील तुटवडा भासू शकतो, हे लक्षात घेऊन केंद्राकडून तो पुरवठाही नियमित होत राहील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक
सध्या राज्याला लसीचा पुरवठा खूप धीम्या गतीने होत आहे. काल 22 एप्रिल रोजी सकाळी आपल्याकडे 6.5 लाख डोस उपलब्ध होते. त्यापैकी दिवसभरात 3.5 लक्ष डोस वापरण्यात आले. काल 2 लाख लसींचा पुरवठा झाला. आज राज्यात सुमारे 5 लाख लसींचा साठा उपलब्ध आहे. महाराष्ट्र लसीकरणात संपूर्ण देशात नंबर एकचे राज्य आहे. त्यामुळे राज्याला शाश्वत व नियमित लसींचा पुरवठा होणे आवश्यक आहे.
लसीच्या एकूण उत्पादनापैकी 50 टक्के राखीव साठय़ातून सर्व राज्यांना आणि खासगी रुग्णालये तसेच कॉपोरेट समुहाच्या रुग्णालयांना लस पुरविली आहे. मात्र कोणत्या राज्याला ती किती प्रमाणात पुरविली जाईल त्याविषयी अधिक स्पष्टता हवी. तसेच लसींची आयात करण्याची परवानगी राज्याने मागितली तर ती मिळायला हवी.
12 कोटी डोसेस हवेत
महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील लोकसंख्या 5 कोटी 71 लाख असून त्यांच्या लसीकरणासाठी 12 कोटी डोसेसची आवश्यकता आहे. देशातील लस उत्पादक एव्हढय़ा कमी कालावधीत मोठय़ा संख्येने त्याचा पुरवठा करू शकणार नाहीत. त्यामुळे थेट आयतीची, तसेच खासगी कॉपोरेटस् समूहांना सीएसआरच्या माध्यमातून लस खरेदीची परवानगी द्यावी,अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.
दुहेरी उत्परिवर्तनाचा अभ्यास आवश्यक
राज्यात विषाणूचे दुहेरी उत्परिवर्तन आढळल्याने संसर्गातही झपाटय़ाने वाढ झाली यासंदर्भात पुढील वाटचालीसाठी याबाबत योग्य तो अभ्यास व्हावा तसेच जिनोम सिक्वेन्सिंग करावे जेणे करून योग्य ते धोरण ठरवता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा वाढवा!
महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठा ही आवश्यक आहे. महाराष्ट्रात 60 हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. राज्याला रोज 1550 मे. टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. सध्या 300 ते 350 मे टन ऑक्सिजन महाराष्ट्रबाहेरून आणला जात आहे. दूरच्या अंतरावरील राज्यातून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याऐवजी जवळपासच्या राज्यातून पुरवठा झाला तर ऑक्सिजन लवकर उपलब्ध होईल. सातत्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणखी 250 ते 300 मे टन अतिरिक्त साठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. राज्याने रेल्वे मार्गाने ऑक्सिजन आणण्याचा प्रयत्न केला. पण प्रवासाचा वेळ व अंतर लक्षात घेता ’वायुदलाची’ व ’राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन’ विभागाची मदत घेण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. मात्र अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील आम्ही काळजी घेत आहोत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने व्यवस्थेवर ताण असला तरी वेगवेगळ्या मार्गाने त्यावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकूच.































































