मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे शेतकऱ्यांचा संत्र्याने भरलेला ट्रक पोलिसांनी केला बंगळुरूला मार्गस्थ

15508

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला येथील शेतकऱ्याचा संत्र्याने भरलेला ट्रक परभणी पोलिसांनी अडवून धरला होता. मात्र शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठवल्यावर तत्परतेने चक्र फिरून अवघ्या दहा मिनिटात ट्रक बंगळुरूकडे मार्गस्थ झाल्याचे शेतकरी बाळू पाटील यांनी सांगितले.

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला येथील बाळू पाटील हे प्रगतिशील शेतकरी असून जवळाबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत. बाळू पाटील यांच्या शेतातील 9 टन संत्रा ट्रकद्वारे बंगळुरुकडे बुधवारी पाठवला जात होता. परभणी जिल्ह्याच्या हद्दीतील झिरो फाटा व पुढे पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे हा ट्रक परभणी पोलिसांनी अडवला. पोलिसांनी बेदम मारहाण केल्याने चालक ट्रक सोडून पळून गेला. त्यानंतर शेतकरी बाळू पाटील यांनी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठवला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय व्यस्त वेळापत्रक असून देखील उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्याच्या या मेसेजची तातडीने दखल घेतली. त्यानंतर दहाव्या मिनिटाला परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांचा फोन शेतकरी बाळू पाटील यांना आला. तसेच झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करतो असे पोलिसांनी सांगून हा ट्रक बंगळुरूकडे मार्गस्थ केला.

उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शेतकऱ्यांना देव भेटला- बाळू पाटील

Balu patil

मी 1994 पासून शिवसैनिक म्हणून काम करतो हे माझे भाग्य आहे. मात्र ट्रक अडवल्यावर शिवसैनिक असल्याची ओळख न देता एक शेतकरी म्हणून मी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना संदेश पाठवला. त्यात शिवसैनिक असा उल्लेख न करता शेतकरी असा उल्लेख केला. अवघ्या दहा मिनिटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी दखल घेऊन पोलिसांना ट्रक मार्गस्थ करायला लावला. मी प्रत्यक्षात देव पाहिला नाही मात्र उद्धव ठाकरे यांच्या रूपाने मला देव भेटला अशी प्रतिक्रिया शेतकरी बाळू पाटील यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉक डाऊन जाहीर केलेल्या दिवशी शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाविषयी काही भाष्य करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी कोणतीही घोषणा केली नाही. सध्या शेतामध्ये असलेल्या संत्रा, टरबूज, खरबूज अशा फळपिकांचे भाव मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यावर कमी झाले होते. शेतकऱ्यांचा सहा ते सात रुपये किलो किलोने घेतला जाणारा टरबूज बागवान मंडळी अडीच-तीन रुपयाला मागत होती. मात्र काल उद्धव ठाकरे साहेबांनी संत्र्याने भरलेला माझा तरक सोडवायला लावल्यावर हे भाव पुन्हा सहा रुपयांवर आले आहेत. शिवसेनेत काम केल्याचे सार्थक झाले असून शेतकरी व सामान्य नागरिकांसाठी संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री व नेतृत्व महाराष्ट्राला लाभले आहे. शिवसेनेत काम केल्याचे पांग फिटले आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारा देव भेटला असे बाळू पाटील यांनी दैनिक सामनाशी बोलताना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या