
राज्यातील तरुणांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याच्या अनुषंगाने आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. आयटीआयमध्ये मुलांना काळाशी सुसंगत तसेच नव्या उद्योगांची आवश्यकता पाहून प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कौशल्य विकास विभाग आणि विविध कॉर्पोरेट्स यांच्या पुढाकाराने हाती घेतलेल्या या उपक्रमास राज्य शासनामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) अद्ययावतीकरण करणे तसेच कोकणाचा पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी ‘कोकणफ्युचर पार्क’सारखे उपक्रम राबविण्याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
टाटा टेक्नॉलॉजी आणि इतर कॉर्पोरेट संस्थांच्या सहयोगातून राज्यातील 419 शासकीय आयटीआय आणि 53 टेक्निकल स्कुल्सचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
कालबाह्य अभ्यासक्रम बंद करा – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आयटीआयमधील कालबाह्य अभ्यासक्रम बंद करून जे अभ्यासक्रम मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरू शकतील त्यांना चालना देणे गरजेचे आहे. शासकीय आयटीआयच्या अत्याधुनिकीकरणासाठी हाती घेतलेला हा कार्यक्रम आता गतिमान करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणात नैसर्गिक संपदेतून विकासाला चालना द्या – डॉ. अनिल काकोडकर
आयटीआयचे आधुनिकीकरण तसेच कोकणच्या पर्यावरणपूरक विकासाठी प्रस्तावित असलेला कोकण फ्युचर पार्क हे दोन्ही कार्यक्रम चांगले आहेत. उद्योग आणि त्यातून रोजगारवाढीसाठी इको सिस्टम तयार होणे गरजेचे आहे. कोकणामध्ये नैसर्गिक संपदा आहे. विविध नैसर्गिक स्रोत आहेत. सर्वांच्या सहभागातून कोकणाच्या विकासाला चालना देता येईल, अशी अपेक्षा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केली.


































































