
सामना प्रतिनिधी । लातूर
येथील ‘स्टेप बाय स्टेप क्लास’ चे संचालक अविनाश चव्हाण यांचा अज्ञात मारेकऱ्याने गोळ्या झाडून निर्घृन खून केल्याची घटना मध्यरात्री घडली. मध्यरात्री एक वाजता ते आपल्या घराकडे जात असताना शिवाजी शाळेजवळ त्यांच्या गाडीवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यात एक गोळी त्यांच्या छातीत लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मारेकऱ्यांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ गोंधळ उडाला. हत्याप्रकरणी स्वतंत्र पथके तयार केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अविनाश चव्हाण स्वत:च गाडी चालवत होते आणि गाडीत ते एकटेच होते. हल्लेखोरांनी ही संधी साधली आणि त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. हल्लेखोर या ठिकाणी दबा धरून बसला होता का त्याचा पाठलाग करत होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
मयत अविनाश चव्हाण यांचा मावसभाऊ अशोक पवार यांनी हत्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यामध्ये तीन क्लासचालकांची नावे संशयित म्हणून घेण्यात आली आहेत. दरम्यान, शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन गृहासमोर नातेवाईकांनी येऊन अविनाश चव्हाण यांची हत्या करणाऱ्यांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला होता.
या घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, पोलीस उपअधीक्षक हिंमत जाधव, गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस निरीक्षक केशव लटपटे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात होता. या घटनेची माहिती येथील शैक्षणिक क्षेत्रात कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मध्यरात्री शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि अनेक जणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या भागात ही हत्या झाली आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
अविनाश चव्हाण यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींची पाळेमुळे खोदून काढू, आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल, त्यासाठी पाच स्वतंत्र पथके कामाला लावली आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी दिली.
क्लास ‘वॉर’चा संशय
लातूर हे शैक्षणिक क्षेत्रात नावारूपाला आले आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात खासगी शिकवणी वर्गही चालतात. काही वर्षात येथे अविनाश चव्हाण यांचे स्टेप बाय स्टेप हे क्लास नावारूपाला आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी क्लासमधील मुलांना एक कोटीचे बक्षीस दिले होते. पुढील वर्षी यापेक्षा दुप्पट बक्षीस वाटणार होते. नांदेड येथेही आपली ब्रँच सुरू केली होती.
शार्प शुटरमार्फत गोळ्या घातल्याचा संशय
शहरात खासगी शिकवणीचा धंदा करणारे स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांचा सुपारी देऊन खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. शार्पशूटरच्या माध्यमातून गोळ्या घातल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
लातूर शहराची ओळख शिक्षणातील लातूर पॅटर्न म्हणून राज्यात झाली आहे. तसेच खासगी शिकवणीचा व्यवसाय म्हणून लातूरची ओळख आहे. स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांचा मध्यरात्री गोळ्या घालून खून करण्यात आला. हल्लेखोरांनी मोटारसायकलचा वापर केला. ज्या पध्दतीने खून करण्यात आला त्यावरून तो सुपारी देऊन करण्यात आला असावा असे वाटते. त्याचप्रमाणे शार्पशूटरच्या माध्यमातून गोळ्या घालण्यात आल्या. त्यामुळे घटनास्थळीच अविनाश चव्हाण यांचा मृत्यू झाला. खासगी शिकवणीच्या स्पर्धेतून, गुंडागर्दीतून की अन्य कारणाने हा खून याचीच चर्चा होत आहे. पण झालेला खून सुपारी देऊनच करण्यात आल्याची दाट शक्यता आहे.




























































