पाहा व्हिडीओ : फायर ड्रीलच्या वेळी विद्यार्थींनीचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

30
सामना ऑनलाईन । कोईम्बतूर 
कॉलेजमध्ये काही दुर्घटना घडल्यास त्यातून आपली कशी सुटका करून घ्यायची याचे प्रात्यक्षिक दाखवत असताना एका विद्यार्थीनीचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे घडली आहे. लोगेश्वरी (१९) असे त्या मुलीचे नाव असून ती कालाईमंगला कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला शिकत होती.  या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोगेश्वरी उडी मारायला तयार नव्हती मात्र ट्रेनिंग देणाऱ्या व्यक्तीने तिला ढकलल्याचे दिसत आहे.
गुरुवारी कालाईमंगला कॉलेजमध्ये फायर सेफ्टीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना आग लागल्यास तेथून स्वत:ला सुरक्षित बाहेर कसे काढायचे याचे देखील प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी  अरुमुगन नावाचा ट्रेनर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत होता. त्याने लोकेश्वरीला दुसऱ्या मजल्यावर उभे राहून उडी मारण्यास सांगितले होते. त्याचवेळी खाली काही विद्यार्थ्यांना तिला झेलण्यासाठी जाळी पकडून उभे करण्यात आले होते. मात्र लोकेश्वरी उडी मारण्यासाठी तयार नव्हती, मात्र अरुमुगन तिला जबरदस्ती करत होता. त्यानंतर त्याने तिला पाठीमागून ढकलेले. खाली तिला झेलण्यासाठी उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना तिला झेलणे शक्य न झाल्याने लोकेश्वरी जोरात डोक्यावर आपटली. यात गंभीर जखमी झालेल्या लोकेश्वरीला खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र खासगी रुग्णालयाने तिला अॅडमिट करून घेण्यास नकार दिल्याने तिला सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अरुमुगनला पोलिसांनी अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या