
सामना प्रतिनिधी । शिर्डी
गेल्या आठ वर्षांपासून कोमात असलेल्या आणि पेशानं डॉक्टर असलेल्या 37 वर्षीय तरुणीला कुटुंबातील सदस्यांनी साईंच्या दरबारी आणलं साईबाबांनीच तिला आता बरं करण्याचं साकडं तिच्या घरच्यांनी घातलंय. आठ वर्षांपासून अंथरुणावर खिळलेल्या वर्धा येथील शितलला 600 किमीचा प्रवास करवून तिला साईदर्शन घडवले. यावेळी तिचे कुटुंबीय अतिशय भावूक झाले होते .
विदर्भातील वर्धा शहरात राहणारे मुंगल कुटूंबीय बाबाराव यांना दोन मुली आहेत. ते एस टी महामंडळात अकाउंट क्लार्क म्हणून सेवा निवृत्त झालेल्या बाबाराव यांची मोठी मुलगी शितल गेल्या आठ वर्षांपासून कोमात गेली आहे. एका अपघाताने तिच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढावला आहे. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत शीतलने बालरोग म्हणून एमडीपर्यंत शिक्षण घेतले आहे आणि मुंबई येथील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये बालरोग विभागात आयसीयु इनचार्ज म्हणून रुजू झाली. त्यानंतर शीतलचा विवाहसुद्धा झाला. लग्नानंतर सर्व काही सुरळीत आणि आनंदात सुरु होते आणि याच दरम्यान सात वर्षांपूर्वी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना पायरी उतरताना तिचा पाय घसरला आणि तिच्या डोक्याला जबर मार लागला. तेव्हापासून ती कोमात आहे गेल्या सात वर्षांपासून देशभरातील अनेक हॉस्पिटल मध्ये आई वडिलांनी तिला उपचारासाठी नेलं मात्र अद्याप यश मिळू शकले नाही. आणि त्यांनी अखेर तिला आपल्या वर्धा येथील निवासस्थानी ठेवण्याचा निर्णय घेतला. बाबाराव यांचे मित्र व साईसेवक म्हणून काम केलेले मुंबई येथील भाटिया यांनी कुटुंबियांना साई दरबारी येण्याची विनंती केली आणि आज मुंगल कुटूंबीय थेट वर्ध्याहून 600 किमी रुग्णवाहिका घेऊन साई दरबारी आले. तिला जेव्हा स्ट्रेचरवर साईमंदिरात दर्शनासाठी नेले जात होते. तो प्रसंग अतिशय भावूक झाला होता. बाबांच्या दरबारातही पहिल्यांदा एखाद्या रूग्णाला अशाप्रकारे स्ट्रेचरवर दर्शनासाठी आणण्यात आले होते. साईबाबांवर असलेली अपार श्रद्धा शितलला नक्की बरे करील, हा विश्वास तिच्या घरच्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोमावस्थेत असणाऱ्या शीतलला स्ट्रेचर वरून आज साई मंदिरात आणण्यात आले. या ठिकाणी साई समाधी समोर शीतलला नेले आणि साईबाबांचे तीला दर्शन घडवण्यात आले. ज्यावेळी विज्ञान संपते त्यावेळी अध्यात्म सुरु होते, अशी भावना जनमानसात आहे. अनेकदा वैद्यकीय उपचार संपल्यावर ईश्वराकडे धावा केला जातो. याच उक्तीप्रमाणे आज मुंगल कुटुंबियांनि साईंच्या दरबारी हजेरी लावत साईंना आपल्या मुलीच्या प्रकृतीसाठी साकडं घातलंय हिच श्रद्धा माणसाला देवाच्या जवळ घेऊन जाते असे तिच्या आई वडिलांनी सांगितले.




























































