
पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस ठाणे प्रमुखांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराइतांची झाडाझडती घेतली. पोलिसांनी 30 एप्रिलला मध्यरात्री राबविलेल्या विशेष मोहिमेत 3 हजार 148 गुन्हेगारांची तपासणी केली. त्यापैकी 714 गुन्हेगार मिळून आले आहेत. त्याशिवाय अमली पदार्थ तस्करांविरूद्ध कारवाई करून इतर आरोपींकडून 12 कोयते, तलवारी, चाकू असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
गुन्हे शाखेसह पोलीस ठाण्यातील विविध पथकांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून बेकायदा शस्त्रे बाळगल्या प्रकरणी 18 जणांना अटक केली. त्यांच्याकडून १२ कोयते, चार तलवारी, चाकू, पालघन अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. त्याशिवाय गंभीर गुन्ह्यात पसार असणारे आरोपी संतोष लक्ष्मण राठोड (वय १९, रा. शांतीनगर, वानवडी), सूर्यकांत उर्फ पंडीत दशरथ कांबळे (वय 26, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकरनगर झोपडपट्टी, दत्तवाडी) यांना अटक करण्यात आली. बेकायदा हुक्का पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी अनिकेत अनंत देसाई (वय 36), दिग्विजय सनातन नायक (वय 25, दोघे रा. गीतांजली बिल्डींग, ओैंध) यांना अटक केली. बेकायदा गावठी दारु विक्री प्रकरणात नऊ जणांना अटक करण्यात आली. 72 लिटर गावठी दारू, दारु तयार करण्याचे साहित्य, 260 लिटर ताडी, बिअर बाटली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शनिवारी मध्यरात्रीपर्यंत हॉटेल आणि लॉजची तपासणी करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान 609 संशयितांना थांबवून तपासणी करण्यात आली. त्याशिवाय 18 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक विभागाने 398 वाहनचालकांकडे परवाना, कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये १४ दुचाकी, 22 तीनचाकी, 19 चारचाकी मिळून 55 वाहनचालकांविरूद्ध कारवाई करण्यात आली.
कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सराइतांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात पोलिसांनी 30 एप्रिल रात्री नउ ते 1 मे रात्री मध्यरात्री दोनपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबविले. त्यानुसार तीन हजारांवर गुन्हेगारांची झाडाझडती घेउन कारवाईचा बडगा उगारण्यात आला. प्रतिबंधात्मक कारवाईमुळे गुंडगिरी आणि दादागिरी करणाऱ्यांवर जरब बसण्यास मदत होणार आहे.
– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त





























































