
सामना प्रतिनिधी । मुंबई
हिंदुस्थानचा कसोटीपटू पृथ्वी शॉने कफ सिरपमधून उत्तेजक घेतल्याचे पुढे आल्यानंतर त्याच्यावर बीसीसीआयने आठ महिन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावली. यावर हिंदुस्थानातील क्रीडापटूंकडून बीसीसीआयवर ताशेरे ओढण्यात आहे. एवढेच नव्हे तर बीसीसीआयच्या डोपिंग प्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. यावर मुंबईचा महान खेळाडू अमोल मुजुमदार याने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, हिंदुस्थानातील इतर खेळ वाडाच्या कक्षेत आले आहेत. तर मग बीसीसीआयने यायला काय हरकत आहे. तसेच कोणत्याही व्यावसायिक खेळाडूने कोणत्याही गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असेही तो पुढे स्पष्टपणे म्हणाला.
बीसीसीआयकडून डोपिंगबाबत मार्गदर्शन
बीसीसीआयकडून 19 वर्षांखालील संघांपासून इतर वयोगटासाठीही डोपिंगबाबत मार्गदर्शन करण्यात येते. त्यामुळे निगडीत असलेल्या सर्व वयोगटांतील खेळाडूंनी मन लावून ऐकल्यास ते डोपिंगमध्ये अडकणार नाहीत. अर्थात बीसीसीआयनेही वाडाच्या कक्षेत यायला हवे, असे अमोल मुजुमदारला वाटते.
सर्व सोयी उपलब्ध,डोपिंगमध्ये अडकण्याचे प्रमाण कमी व्हावे
आता क्रीडाक्षेत्रात कमालीची सुधारणा झालीय. क्रिकेट या खेळाने तर उत्तुंग झेप घेतलीय. बीसीसीआय आपल्याशी निगडीत असलेल्या संघांतील खेळाडूंना फिजीयो, ट्रेनर, सपोर्ट स्टाफ पुरवते. फक्त खेळाडूंनी काळजी घेण्याची गरज आहे. कोणतीही गोष्ट करताना सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध असताना डोपिंगमध्ये अडकण्याचे प्रमाण कमी व्हायला हवे, असे अमोल मुजुमदार याने यावेळी सांगितले.



























































