
‘नीट’वरून सुरू असलेल्या गोंधळाचा वीट आलेला असतानाच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) घेतल्या जाणाऱ्या आणखी एक परीक्षेत गोंधळ झाला आहे. कॉमन युनिव्हर्सिटी एण्टरन्स टेस्ट (सीयूईटी-यूजी) देण्यासाठी केंद्रावर पोहोचलेल्या हजारो विद्यार्थ्यांना देताच आली नाही, तर काही ठिकाणी दोन तास उशिरा पेपर सुरू झाला. त्यामुळे विद्यार्थी-पालकांना कडक उन्हात ताटकळत राहावे लागले. या प्रकारामुळे केंद्र सरकार पुन्हा टीकेच्या रडारवर आले आहे.
सीयूईटी (यूजी) 2026ची परीक्षा आज, 30 मे रोजी होणार होती. सकाळच्या सत्राचा पेपर 7 वाजता सुरू होणार होता. त्यासाठी विद्यार्थी ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर पोहोचले. तांत्रिक कारणामुळे परीक्षा नियोजित वेळी सुरू होणार नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. परीक्षा नेमकी कधी सुरू होणार हेही कोणी सांगत नव्हते. त्यामुळे विद्यार्थी व सोबत पालक परीक्षा सुरू होण्याची वाट पाहत केंद्राबाहेर ताटकळत राहिले. अनेक केंद्रांवर पेपर दोन ते तीन तास उशिरा सुरू झाला, तर अनेक ठिकाणी परीक्षा होऊच शकली नाही. दुपारच्या सत्रातही हाच प्रकार घडला. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मीडियात आरडाओरड सुरू झाल्यानंतर एनटीएने गोंधळाची कबुली दिली.
विरोधकांचा मोदींवर निशाणा
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी व आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ‘नीट, सीबीएसई, एसएससी आणि आता सीयूईटी. चार परीक्षा झाल्या. ‘विश्वगुरू’ म्हणवून घेणाऱ्या मोदींच्या सरकारला एक परीक्षा नीट घेता आली नाही. ज्या पिढीचे भविष्य तुम्ही बरबाद करत आहात, तीच पिढी तुम्हाला जाब विचारणार,’ असा इशारा राहुल यांनी दिला. तर, ‘देशाला सुशिक्षित पंतप्रधानांची गरज आहे,’ असा टोला केजरीवाल यांनी हाणला.

























































