सोलापूरकरांची चिंता वाढली, कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना लस प्रमाणपत्राची सक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील सोलापूरकरांची चिंता वाढली असून, कर्नाटकात ओमायक्रॉनचे संशयित रुग्ण आढळल्याने सीमेवरून येणाऱ्या प्रवाशांना लस प्रमाणपत्रांची सक्ती करण्यात आली आहे. याकरिता तपासणी पथकेही उभारण्यात आली आहेत.

कर्नाटकात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून, या पार्श्वभुमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने दक्षता घेत सीमेवर असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी व दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत. कर्नाटकातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करण्यात येत असून, दोन लसींचे प्रमाणपत्र असलेल्यानांच जिल्हय़ात प्रवेश देण्यात येत आहे. या तपासणी केंद्रामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. याशिवाय आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे.

कर्नाटकातून महाराष्ट्रात येण्यासाठी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, सांगोला तालुक्यातून मार्ग आहेत. याशिवाय सादेपूर औज, तडवळ, शेगाव यागावातूनही कर्नाटकातून जिल्हय़ात प्रवेशाचे मार्ग आहेत. त्यामुळे या गावातील रस्त्यावरही तपासणी पथके ठेवावीत अशी मागणी गावकऱयांनी केली आहे. प्रशासन दक्षता घेत असून, आजपासून कर्नाटकातील प्रवाशांना लसीचे प्रमाणपत्राबरोबरच तपासणी करूनच जिल्हय़ात प्रवेश देण्यात येत आहे.