श्री सिद्धनाथ रथयात्रेला प्रशासनाची सशर्त परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हसवडचे आराध्य दैवत, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी रथयात्रेला कोरोना महामारीच्या संकटाच्या कारणाने प्रशासनाने सलग दुसऱया वर्षीही बंदी घातली. मात्र, नागरिकांनी प्रशासनाचा निषेध करून म्हसवड शहर बंद ठेवले होते. त्यामुळे प्रशासनाने रविवारी (दि. 5) रिंगावण यात्रा पटांगणात रथ ओढण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

म्हसवडचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांची रथयात्रा रविवारी होणार आहे. यासाठी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. नीलेश देशमुख. तहसीलदार सूर्यकांत येवले, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे, नगराध्यक्ष तुषार वीरकर, रथाचे मानकरी माजी नगराध्यक्ष अजित राजेमाने, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांची बैठक झाली होती.

यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी रथयात्रेचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याकडे सोपविण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांच्याकडून यात्रेबाबत तातडीने निर्णय घेणे अपेक्षित होते; परंतु कोरोना ओमायक्रॉनमुळे अखेर 3 रोजी रथ स्थिर ठेवून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा व मंदिरात सामाजिक अंतर ठेवून भाविकांनी दर्शन घेणे आदी अटी- शर्ती लागू करण्यात आल्या होत्या. यामुळे नागरिकांनी शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर नागरिक व प्रशासनात सकाळी चर्चा होऊन रथयात्रेला रिंगावण पटांगणात रथ ओढण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.