
सामना ऑनलाईन, दापोली
आंबेनळी अपघातात हकनाक मृत्युमुखी पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांनी बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई याच्यावर कठोर कारवाई व्हावी, त्याची नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी करत बुधवारी धडक मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात सर्वपक्षीय नेतेमंडळी सहभागी झाली होती. ‘आंबेनळी अपघातात बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाई याला फाशी द्या’, ‘अपघाताची चौकशी करून कठोर कारवाई करा’ अशा घोषणा आमदार अशोक पाटील, आमदार संजय कदम यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कोळी समाजबांधवांकडून दिल्या जात होत्या. सगळय़ांच्याच भावना या वेळी तीव्र होत्या. या वेळी कोळी महासंघाकडून देण्यात आलेल्या निवेदनात हा अपघात नसून ‘घातपात’ असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाकडून प्रकाश सावंत-देसाई यांना सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याची ऑर्डर बुधवारी इश्यू करण्यात आली आहे.

28 जुलै रोजी आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात एकूण 30 कर्मचारी मृत्युमुखी पडले. यामध्ये तालुक्यातील पाजपंढरी येथील तीन सुपुत्रांचा समावेश होता. या अपघातास प्रकाश सावंत देसाईही बचावलेली व्यक्तीच या अपघातास जबाबदार असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. अशा व्यक्तीला विद्यापीठ प्रशासनात ठेवू नये अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. यासाठी काढण्यात आलेला धडक मोर्चा थेट विद्यापीठ प्रशासन इमारतीकडे दुपारी 12 च्या सुमारास आला. या मोर्चाला कुलसचिव डॉ. सुभाष चव्हाण, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे समोर गेले व त्यांनी मार्चाचे नेतृत्व करणारे आमदार अशोक पाटील, आमदार संजय कदम, पी. एन. चोगले, भगवान घाडगे, किशोर देसाई आदी पदाधिकारी व संतप्त मोर्चेकऱ्यांना आपल्या दालनात चर्चेसाठी नेले.
या सगळय़ा प्रकाराविरोधात आम्ही आवाज उठविणार असून बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सभागृहात करण्यात येईल. या प्रकरणात पोलीस यंत्रणा व आरटीओ यांचाही तपास असमाधानकारक असून याचीही चौकशी करावी अशी मागणी आपण शासनाकडे करणार असून कोकणातील सर्वपक्षीय आमदार यासाठी एकत्र येऊन मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देणार असल्याचे आमदार अशोक पाटील व आमदार संजय कदम यांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांना सेवेत घेण्यासाठीही योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
प्रशासन कोणालाही पाठीशी घालणार नाही – कुलसचिव
या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी शासनाकडे, विद्यापीठ प्रशासनाकडेही पत्र देऊन करण्यात येईल. या अपघातात जे 30 कर्मचारी गेले त्यासाठी आम्हालाही होणारे दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही असेच आहे. आपल्या सगळय़ांच्या तीव्र भावना लक्षात घेऊनच प्रशासनाकडून प्रकाश सावंत देसाई यांना आजपासूनच सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याचे सांगितले.
…हा तर घातपात
आंबेनळी घाटात झालेला अपघात व गेलेले निष्पापांचे जीव परिस्थितीजन्य पुरावे पाहता हा घातपातच होता असा खळबळजनक आरोप कोळी महासंघाचे पदाधिकारी अपघातात मृत्युमुखी पावलेल्या किशोर चौगुले याचे वडील पी. एन. चौगुले यांनी केला आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून आम्हाला चांगले सहकार्य मिळाले आहे. आमचा प्रशासनावर कोणताही राग नाही, मात्र प्रकाश सावंत देसाई यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी, अन्यथा येत्या गणेशोत्सवात यापेक्षाही मोठा मोर्चा निघेल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. या वेळी विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनावर गजानन तबीब, काशीनाथ चोगले, रघुनाथ चौलकर, दत्ताराम पेडेकर, नारायण खळे, महेश पाटील, महादेव चोगले, दिनेश कालेकर, अनंत चोगले, गणेश रघुवीर, लीलाधर चोगले, विष्णू तबीब, वामन चोगले, महेश पाटील, दिलीप चोगले यांच्या सह्या आहेत.




























































