
गुजरात येथील अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या 36 व्या राष्ट्रीय खेळ महोत्सवात राष्ट्रीय खोखो स्पर्धेत कर्णधार ऋषिकेश मुर्चावडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र खोखो संघाला सुवर्णपदकाचा बहुमान मिळाला. या नेत्रदीपक कामगिरीबद्दल महाराष्ट्राचा कर्णधार ऋषिकेशचे आणि संघातील सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन, असे अभिनंदनाचे संदेश महाराष्ट्राच्या हजारो क्रीडाशौकिनांनी सोशल मीडियावर संघाला पाठवले आहेत. ऋषिकेशने लहानपणापासून अत्यंत कठोर परिश्रम घेऊन आणि खोखो हेच ध्येय आणि ध्यास ठेवून खूप मेहनत घेतली आहे. दररोज व्यायाम, फिटनेस आणि दैनंदिन सराव, सातत्य या गोष्टींना नेहमीच पहिले प्राधान्य दिले. त्यामुळेच आज तो महाराष्ट्राचा कर्णधार झाला आणि त्याच्या नेतृत्वाखाली आपला संघ सुवर्णपदकाचा विजेता ठरला आहे.






























































