
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर येथील काँग्रेस भवनमध्ये जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील इच्छूक काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. लातूर शहर मतदारसंघातून आमदार अमित देशमुख यांनी तर लातूर ग्रामिण मतदारसंघातून त्यांचे बंधू धिरज देशमुख यांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. सहा विधानसभेसाठी 27 जणांनी उमेदवारी मागितली आहे.
लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या सहाही विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस इच्छूकांच्या मुलाखती आज काँग्रेस भवन येथे पक्षाचे निरीक्षक कल्याण काळे, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, जिल्हाअध्यक्ष व्यंकट बेद्रे, शहराध्यक्ष मोईज शेख यांनी घेतल्या. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अमित देशमुख यांनी मुलाखत देऊन उमेदवारी मागीतली तर लातूर ग्रामिण विधानसभा मतदारसंघातून धिरज देशमुख यांनी उमेदवारी मागीतली आहे. काँगे्रसकडून उमेदवारी मागणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने आमदार त्र्यंबक भिसे, अशोक पाटील निलंगेकर, शंकर गुट्टे, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, ताजोद्दीन बाबा, श्रीशैल्य उटगे, विद्या पाटील, पंडीत धुमाळ, अभय साळुंके, मच्छिंद्र कामंत, धर्मा सोनकवडे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.





























































