
संसदेचे अधिवेशन सुरू असताना हिमाचलमधील भाजपचे खासदार रामस्वरूप शर्मा यांनी कथित आत्महत्या केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत केलेल्या आत्महत्येचा विषय ताजा असताना आणि त्यांच्या आत्महत्येची तड अजूनही लागलेली नसताना शर्मा यांनी मृत्यूला कवटाळल्याने मोदींच्या कार्यकाळात खासदारही सुरक्षित नाही, असा संदेश देशभरात गेला आहे.
शर्मांवर कसला दबाव होता हे अजून स्पष्ट झालेले नाही. अत्यंत साधी राहणीमान असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले रामस्वरूप हे अत्यंत उमद्या मनाचे सज्जन गृहस्थ होते. ते आत्महत्या करूच शकत नाहीत, असा त्यांच्या निकटवर्तीयांचा दावा आहे. शर्मा संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘गोमती’ या खासदार निवासामध्ये राहत होते. तिथे कोणतीही ‘सुसाईड नोट’ सापडलेली नसल्याने शर्मांच्या मृत्यूबाबत संदिग्धता वाढली आहे.
शर्मांना हृदयाचा आजार होता. त्याला कंटाळून त्यांनी जीवनयात्रा संपवली, असे तर्प सत्तापक्षाकडून दिले जात आहेत, मात्र जीवनाची अखेर होण्यापूर्वीपर्यंत शर्मा तणावरहित होते. कबड्डीचे ते नॅशनल प्लेयर होते. त्यामुळे असा माणूस आत्महत्या करेल, यावर सध्या तरी कोणाचा विश्वास नाही. देशातील अनेक खासदार सध्याच्या मोदी सरकारच्या कारभारामुळे आर्थिक विवंचनेत जरूर आहेत. दोन वर्षांचा खासदार निधीच मोदींनी कोरोनाचे कारण पुढे करून रद्द केल्यामुळे बहुतांश खासदारांना मतदारसंघातील गावात जाता येत नाही. जनतेच्या अपेक्षा गगनाला भिडलेल्या आहेत दुसरीकडे मोदी सरकारने हक्काचा खासदार निधीही बंद केला. त्यामुळे मतदारांना काय उत्तर द्यायचे, अशा सगळ्या विवंचनेत खासदार आपले जीवन जगत आहेत. देशाच्या नव्या संसद निर्माणासाठी हजारो कोटींचा धुरळा उडवला जात आहे, मात्र संसदेचे खरे प्रतिनिधी असलेल्या खासदारांना ‘लंकेची पार्वती’ बनवले जात आहे.





























































