कुटुंब वाढवायचंय, सुट्टी द्या! हवालदाराची वरिष्ठांना विनंती

34

सामना ऑनलाईन, लखनौ

सुट्टी मिळावी म्हणून कर्मचारी वरिष्ठांना अनेकदा खोटं सांगतात. माझी तब्येत बरी नाही, नातेवाईक आजारी आहेत, जवळच्या नातेवाईकांचे निधन झाले अशी विविध कारणं सुट्टी मिळवण्यासाठी सर्रासपणे ऐकायला मिळतात. मात्र काही कर्मचारी असे असतात जे खरं कारण सांगतात आणि सुट्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात. उत्तर प्रदेशातील एका हवालदाराने सुट्टीसाठी खरं कारण सांगितलं मात्र त्याचं कारणं ऐकून पोलीस दलावर लोकं हसायला लागली आहेत.

सोम सिंह नावाच्या एका हवालदाराने कुटुंबकबिला वाढवण्यासाठी सुट्टीचा अर्ज केला. आश्चर्याची बाब ही आहे की त्याच्या या अर्जावर ३० दिवसांच्या ऐवजी ४५ दिवसांची सुट्टी मंजूर करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. या शिफारसपत्रावर  ‘फॉर फॅमिली डेव्हलपमेंट’ असा शेरा देखील लिहला आहे. ही बातमी उत्तर प्रदेशात वाऱ्यासारखी पसरली. आपली बदनामी होतेय हे लक्षात आल्यानंतर सोम सिंह याच्या वरिष्ठांनी त्याला दुसरं कारणं देत नवा अर्ज सादर करण्यास सांगितलं. यावर सोम सिंह याने महत्वाच्या कामासाठी घरी जायचे असल्याने २४ जूनपासून पुढचे १० दिवस सुट्टी मिळावी असा अर्ज सादर केला आहे.  पोलीस अधीक्षकांना या सुट्टीच्या अर्जाबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की सोम सिंह यांनी सुट्टीसाठी अर्ज केलाय मात्र  कुटुंब वाढवण्यासाठी सुट्टी मागितल्याच्या अर्जाची बातमी खोटी आहे. सोम सिंह याचं हे पत्र कोणी आणि कसं व्हायरल केलं याबाबत आपल्याला माहिती नसल्याचंही अधीक्षकांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या