#corona नगर शहरातील 26 दुकांनाविरुद्ध गुन्हे दाखल, शासकीय आदेशाचा भंग केल्यास कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

प्रशासनाने लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाची दखल न घेता दुकाने सुरू ठेवणाऱ्या 26 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. शासकीय आदेशाचा भंग केल्यास केल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

कोरोना या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व कोरोनाचा संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ न होऊ देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याकरीता राज्य शासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना काढली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात दुकाने, सेवा आस्थापना, उपहारगृहे, खादयगृहे, खानावळ, शॉपींग कॉम्पलेक्स मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब-पब, क्रिडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उदयाने, सिनेमागृहे, नाटयगृहे, शाळा, महाविदयालये, खासगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालय, व्हिडीओ पार्लर्स, ऑनलाईन लॉटरी सेंटर इत्यादी बंद राहतील असे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. सदर आदेशांचा भंग केला व दुकाने सुरू ठेवून गर्दी केल्याने नगर शहरामध्ये 26 दुकानदारांवर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.