मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर महाराष्ट्र समाधानी, ‘एबीपी माझा-सी व्होटर्स’चे सर्वेक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून कोरोना महामारीच्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. या संकटाच्या काळातही राज्य सरकारने केलेले काम उत्तम आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर महाराष्ट्रातील जनता समाधानी असल्याचे मत ‘एबीपी माझा-सी व्होटर्स’च्या सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे.

कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने केलेले काम आणि इतर मुद्यांच्या आधारे एबीपी माझा-सी व्होटरने सर्व्हे केला आहे. यामध्ये सरासरी 51.94 टक्के लोकांनी पसंती दर्शविली. तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर सरासरी 61.05 टक्के लोकांना समाधान व्यक्त केलं आहे.

भाजप सरकारच्या कामगिरीवर जनता नाराज

सात वर्षांच्या कार्यकाळात नोटबंदी, जीएसटी यांसारखे आर्थिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांवर परिणाम करणारे निर्णय मोदी सरकारने घेतले. याचे थेट परिणाम आता देशाच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहेत. त्याचबरोबर कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल देशातील जनता केंद्रातील भाजप सरकारवर नाराज असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

मोदी-शहांवर जनता नाखूश

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर देशातील 32.97 टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे, तर 33.6 टक्के जनतेने असमाधानी अर्थात नाखूश असल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कामगिरीवर 41.84 टक्के लोकांनी असमाधानी, तर 21.11 टक्के लोकांनी समाधानी असल्याचे मत नोंदवले आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या कामगिरीवर 35.89 टक्के लोकांनी असमाधानी असल्याचे म्हटले आहे.