तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू राहतील असे नियोजन हवे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिसऱया लाटेतही राज्यातले उद्योग सुरू राहतील असे नियोजन करायला हवे. हे उद्योग सुरू ठेवण्यासाठी जी तयारी करणे आवश्यक आहे ती करण्यासाठी मोठय़ा उद्योगपतींची बैठक घेऊन मार्गदर्शन करा. ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे तिथे त्यांनी त्याचे वेळीच नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून कामगारांची तिथे राहण्याची व्यवस्था करा, त्यादृष्टीने त्यांना जिल्हाधिकाऱयांनी आवश्यक असलेले सहकार्य करावे, अशा सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱयांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे चर्चा करून कोरोना स्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योग आणि आर्थिक चळवळ सुरू राहण्यासाठी कामगारांचे येणे जाणे हे त्यांच्या कामाचे ठिकाण आणि घर इथपर्यंतच मर्यादित राहणे गरजेचे आहे.

नियमांचे काटेकोरपणे पालन करा

अजून कोरोनाची दुसरी लाट पूर्णत्वाने ओसरलेली नाही. परंतु याही स्थितीत कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन आपण हळुवारपणे काही आर्थिक उपक्रम सुरू करत आहोत. हे करताना सावधगिरीची पावले म्हणून जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत, ते कागदावर राहणार नाहीत, ते काटेकोरपणे अमलात येतील, कुठेही गर्दी होणार नाही, सभासमारंभ होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

  •  आता पावसाळा आहे, या काळात साथीचे इतर आजार उद्भवतात. त्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. याच काळात आपले सणसमारंभही सुरू होतात. ही सगळी परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे.

पारनेर तालुक्यात जिनोम सिक्वेन्सिंग

पॉझिटिव्हिटी दर जास्त असलेल्या कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिह्यांत केलेल्या उपाययोजनांनंतरच्या स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यात सर्वच जिह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर तुलनेने कमी होत असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी नगर जिह्यातील पारनेर तालुक्यात जिनोम सिक्वेन्सिंग करून घेण्याचे निर्देशही आरोग्य विभागाला दिले. होमगार्ड नियुक्ती, फिरती चाचणी केंद्रे आणि इतर आरोग्य सुविधांविषयक मागणीचा ज्या जिह्यांनी उल्लेख केला त्यांच्या मागणीची दखल घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

लसीच्या दुसरा डोस घेण्यासाठी जनजागृती करा

आशा-अंगणवाडीसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत गावागावांत जनजागृती करून कोराना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेले सर्वजण दुसरा डोस वेळेत घेतील यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या.
खासगी रुग्णालयांनी लसींचे डोस

वाढवून मागावेत – राजेश टोपे

चाचण्या वाढवणे, गृह विलगीकरण कमी करणे हे पॉझिटिव्हिटी रेट जास्त असलेल्या जिह्यांसाठी महत्त्वाचे आहे. राज्यातील खासगी रुग्णालयांनी लसीचे डोस वाढवून मागितल्यास राज्यात लसीकरणाला आणखी वेग देता येईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱयांना निर्देश

कोरोनाच्या दोन लाटांमधील काळ हा संयम आणि शिस्तीसाठी महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊन आपण काही प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरू करीत असलो तरी अतिशय सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे.