योगा, व्यायाम, मानसिक आधार; कोरोना लढय़ात गणेशोत्सव समितीचा टास्क फोर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कोरोना लढय़ा’त गतवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव समन्वय समितीचे 500 कोविड योद्धे सहभागी होणार आहेत. यामध्ये कोरोनाबाबत जनजागृतीसह तिसरी लाट आल्यास योगा, व्यायामासह, निर्जंतुकीकरण, रुग्ण आणि संशयितांना मानसिक आधार देण्याचे काम केले जाणार आहेत. गेल्या वर्षी या उपक्रमात हजारो लोकांना मदत करण्यात आल्याची माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी दिली.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे अनेक मंडळांसह घरगुती उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. मात्र मुंबईत अजूनही कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे सरकार आणि पालिकेनेही गणेशोत्सवासाठी नियमावली तयार करून दिल्यामुळे आवश्यक खबरदारी घेऊनच उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मुंबईकरांना गणेशोत्सव समितीची टास्क फोर्स मदत करणार आहे. प्रत्येक विभागात 20 जणांची टीम सहकार्यासाठी तैनात ठेवण्यात येईल. या तरुणांना ओळखपत्र आणि ड्रेस कोडही देण्यात येईल. या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी, तरुण आणि इच्छुकांचेही सहकार्य घेण्यात येईल, अशी माहिती दहिबावकर यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझ्मा दान असे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. शिवाय डेंग्यु-मलेरिया जनजागृतीचे कामही केले जाईल, असेही ते म्हणाले. कोविड योद्ध्यांसह विसर्जनावेळी मदत-सहकार्य करण्यासाठी लाइफ गार्डच्या धर्तीवर गणसेवक, मंडपात खबरदारी आणि आपत्कालीन स्थिती घडल्यास कार्यवाही वेगाने करण्यासाठी स्वयंसेवक तैनात असतील.

असे होणार काम

n कोरोनामुळे आलेले नैराश्य घालवण्यासाठी ऑनलाइन योगा, व्यायाम प्रशिक्षण देण्यात येईल. रुग्ण-संशयितांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मानसिक आधारही दिला जाईल. मंडळांना फॉर्म भरण्यासही मदत करण्यात येईल.
n आवश्यकतेनुसार निर्जंतुकीकरण मोहीमही राबवण्यात येईल. जनजागृतीसाठी भित्ती पत्रके आणि विविध माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन करण्यात येईल. या कामात कोविड योद्धय़ांच्या आरोग्याची काळजीही समन्वय समिती घेईल.
n रुग्ण-संशयितांना मार्गदर्शन करणे, रुग्णालय-अॅम्ब्युलन्सने जादा बिल आकारल्यास न्याय मिळवून देणे ही कामेही करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकार आणि पालिकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन मंडळांकडून होते की नाही यावरही कोविड योद्धय़ांची नजर राहणार आहे.