
गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्ण आणि सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण सुरू असून आज दिवसभरात 2 हजार 380 रुग्ण सापडले, तर सक्रिय रुग्णांची संख्या 30 हजारांवरून 27 हजारांवर पोहोचली आहे. दरम्यान, आज 15 जणांचा मृत्यू झाला.
देशभरात मे महिन्यात कोरोना रुग्ण आणि सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होईल अशी भीती कोरोनाच्या राष्ट्रीय टास्क फोर्स आणि केंद्रीय आरोग्य खात्याने व्यक्त केली आहे, मात्र एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापासून ते मे महिन्यात पहिल्या आठवडय़ापर्यंत कोरोना रुग्ण आणि सक्रिय रुग्णसंख्येत विक्रमी घट पाहायला मिळत आहे. दरदिवशी सरासरी 10 हजारांवर गेलेली कोरोनाची रुग्णसंख्या आता तीन हजारांच्या खाली उतरली आहे तर 67 हजारांवर पोहोचलेली सक्रिय रुग्णांची संख्या 27 हजारांवर पोहोचली आहे. दरम्यान, देशभरात 220 कोटी 66 लाख कोरोना डोस देण्यात आले आहेत.
मुंबई 48 तर राज्यात 177 रुग्ण
मुंबई आणि राज्यातही आज रुग्णसंख्येत विक्रमी घट झाली. राज्यात आज 177 रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला. 424 जण कोरोनामुक्त झाले, तर 1 जानेवारी 2023 पासून आतापर्यंत राज्यात 107 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुंबईत आज 50 च्या खाली रुग्णसंख्या आली असून दिवसभरात 48 रुग्ण सापडले. 105 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रिय रुग्णांची संख्या 453 वर पोहोचली आहे.




























































