कोरोनाच्या आरटीपीसीआर टेस्टचा बोगस रिपोर्ट देणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिल्हा रुग्णालयात कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट केली नसतानाही त्या संबंधीचा बोगस रिपोर्ट मिळविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 14 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत घडली आहे.

गणेश प्रकाश घोरपडे (रा. निसराळे, ता. सातारा), अजय संजय डुबल (रा. शिवाजीनगर), महेश रामचंद्र जाधव (रा. अंबकडे, ता. सातारा), प्रमोद आनंदराव माने (रा कुमठे, ता. सातारा), हरिदास नाथा कुंभार (रा. नागझरी, ता. कोरेगाव) या पाच संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

संशयितांनी संबंधित कोरोना आरटीपीसीआर टेस्ट सातारा जिल्हा रुग्णालयात रिपोर्ट मिळवला. मात्र, त्यांनी सातारा जिल्हा रुग्णालयात टेस्ट केलेलीच नाही, ही बाब समोर आल्यानंतर त्याबाबतची चौकशी करण्यात आली. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केलेल्या चौकशीत हे रिपोर्ट बोगस, खोटे असल्याचे समोर आले.

या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कतीने शहर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचे बोगस रिपोर्ट मिळाल्याचे समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली आहे. संशयितांनी तो रिपोर्ट कुठून मिळवला? पैशांची देवाणघेवाण कितीची झाली? रिपोर्ट देणारे कोण आहेत? आतापर्यंत किती बोगस रिपोर्ट केले गेले? या टोळीमध्ये कोण-कोण आहेत? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.