
कोरोनाबद्दल सामान्य नागरिकांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे सोशल मीडियावरून किंवा प्रवासातील चर्चेतून मिळणारी माहिती खरी मानून अनेक नागरिक स्वतःची दिशाभूल करून घेत आहेत. अनेक प्रकारच्या अफवा कोरोनाबद्दल पसरल्या आहेत. त्या निव्वळ अफवा असून वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न तज्ञांनी केला आहे.
ऍण्टिबायोटिक्स या विषाणूवर प्रभावी आहेत
ऍण्टिबायोटिक्स ही जिवाणूंवर (बॅक्टेरिया) प्रभावी असतात विषाणूंवर नाही. विषाणू हे प्रतिजैविकांनाही प्रतिकार करू शकतात. कोरोनावर अद्याप प्रतिबंधक औषध बनलेले नाही. सध्या कोरोनाच्या रुग्णांसाठी एयआयव्ही, इबोला आणि मर्स या आजारांवर उपचारासाठी दिली जाणारी औषधे वापरली जात आहेत.
सतत मास्क लावावा
मास्कचा वापर फक्त रुग्णांनीच करावा. रुग्णामुळे इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून त्याला मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो. चांगल्या व्यक्तींनी मास्क वापरला किंबहुना तो चुकीच्या पद्धतीने परिधान केला तर फायद्याऐवजी तोटाच होण्याची शक्यता असते. मात्र गर्दीत सुरक्षिततेसाठी तोंडावर रुमाल बांधण्याचा सल्ला दिला गेला आहे.
कोरोनाची लागण झाल्यास मृत्यू अटळकोरोनाचा मृत्यूदर 3 टक्के आहे. 100 बाधित रुग्णातील 3 जणांच्या मृत्यूची शक्यता असते. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोरोनाला निश्चितच प्रतिबंध करता येईल.
श्वास रोखल्याने संसर्ग टाळता येतो
कोरोनाचा संसर्ग श्वसनलिकेद्वारेच होतो. श्वास रोखल्याने टाळता येत नाही. शिंक किंवा खोकल्यातून हवेत पसरणाऱया कणांद्वारे बाधा इतरांना होते.
भरपूर पाणी प्यायल्यास विषाणू मरतो
भरपूर पाणी प्यायल्यास विषाणू पोटात जाऊन पोटातील आम्लामुळे ते मरतात, असा गैरसमज पसरला आहे. पण अद्याप वैज्ञानिकदृष्टय़ा तसा निष्कर्ष निघालेला नाही.
कोरोनाचा विषाणू उन्हाळ्यात जिवंत राहू शकणार नाही असे गृहीत धरले तर तो 37 डिग्री तापमान असलेल्या मानवी शरीरातही जिवंत राहू शकला नसता. तरीसुद्धा हे खरे मानले तर ते उन्हाळ्यातच स्पष्ट होईल.
कोरोना विषाणूंचा प्रसार हा डासांमार्फत नाही तर माणसांपासून माणसाला होत आहे. डास हे रक्तामार्फत रोगप्रसार करत असतात. आजारी व्यक्तीला चावलेला डास इतर व्यक्तीला चावल्यास त्याला रक्तातून बाधा होते. कोरोनाचा संसर्ग फक्त हवेमार्फत होतो.
लसूण, व्हिटॅमीन सी प्रभावी
चांगल्या आरोग्यासाठी लसूण आणि व्हिटॅमीन ‘सी’ आवश्यक असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पण या दोन पदार्थांमुळे कोरोना रोखता येऊ शकतो याबद्दल अद्याप काही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. पण कमतरता नसताना व्हिटॅमीन भरपूर प्रमाणात घेतली गेली तर त्याचा शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो.
चीनमधून आलेले सामान घेणे सुरक्षित नाही
कोरोनाचा विषाणू हा पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱया खोक्यांवर अधिक वेळ जगू शकत नाही. त्यामुळे चीनमधून आलेल्या पार्सलवर विषाणू असतील तर ते तुमच्याकडे पोहोचेपर्यंत मेलेले असतील.
शरीरावर अल्कोहोल स्प्रे केल्यास विषाणू जवळ येत नाही
कोरोना विषाणू हा शरीरात प्रवेश केल्यानंतरच त्याचे अवगुण दाखवतो. त्यामुळे शरीरावर अल्कोहोल स्प्रे केला तरी श्वसनाद्वारे तो शरीरात प्रवेश करू शकतो.
यूव्ही किरणे कोरोनाच्या विषाणूला मारतात
अद्याप यावर काही संशोधन झालेले नाही. यूव्ही किरणे ही माणसासाठी हानीकारक असतात. त्यामुळे डोळ्याचे आणि त्वचेचे विकार होऊ शकतात. त्यामुळे या अफवेवर विश्वास ठेवणे म्हणजे माणसासाठी हानीकारकच आहे.
सलाईनच्या पाण्याने नाक धुतल्यास फायदा होतो
सलाईनच्या पाण्याचा वापर चोंदलेले नाक उघडण्यासाठी केला जातो. सलाईनच्या पाण्यामुळे सर्दी नियंत्रणात आणता येऊ शकते; पण कोरोनाला रोखता येऊ शकत नाही.
प्राण्यांद्वारे कोरोनाची लागण होते
चीनमध्ये एक कुत्रा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. परंतु त्याला कोरोनाची काहीच लक्षणे दिसली नव्हती. प्राण्यांद्वारे कोरोनाची लागण माणसाला होऊ शकते याबद्दल काही शास्त्रीय पुरावे नाहीत.




























































