
महाराष्ट्रात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आज राज्य मंत्री मंडळाची तातडीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली आहे. पुण्यातील 5 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र त्याच सोबत जे लोक त्यांच्या संपर्कात आले होते त्यांनाही निगराणी खाली ठेवण्यात आले आहे. त्यांचा वैद्यकीय अहवाल (medical report) आज दुपारी प्राप्त होईल. त्यावर पुढले निर्णय, सरकारची दिशा ठरेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. जर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर हा प्रसार वेगाने होत आहे हे स्पष्ट होईल. मग सरकारला आणखी कठोर, आवश्यक निर्णय घ्यावे लागतील. मात्र हे सर्व रिपोर्टवर अवलंबून आहे, असे त्यांनी सांगितले आहे. जरी असे असले तरी घाबरून जाऊ नका, योग्य ती काळजी घ्या. काळजी घेण्याची नितांत आवश्यकता आहे. गर्दीत जाणे टाळा, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वतः च्या मनाने औषध घेऊ नका!
सध्या वातावरण बदलले आहे. त्यामुळे सर्दी, खोकल्याची रुग्ण आहेत. त्यांनी स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका. दवाखान्यात जा, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या, असे त्यांनी कडक शब्दात सांगितले.
अफवा पसरवू नका
कोरोना संदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका. अफवा पसरवू नका. माहितीची शहानिशा करा. मटण, चिकन मधून कोरोना होत नाही. तेव्हा उगाच अफवा पसरवून गोंधळ वाढवू नका, अन्यथा कारवाई होईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.























































