
कोरोनाचा कहर रोखण्यात लस कंपन्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, जगभरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणाऱया या लसींची निर्मिती करणाऱया विदेशी कंपन्यांचा नफा प्रति सेकंदाला वाढतोच आहे. फायझर, मॉडेर्ना, बायोएनटेक या तीन कंपन्यांचा एकत्रित एका मिनिटाचा नफा 65 हजार डॉलर म्हणजेच प्रति सेकंद या कंपन्या एक हजार डॉलरपेक्षा जास्त नफा कमवत आहेत.
‘पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स’ या संस्थेने याबाबतचा अहवाल तयार केला आहे. लस उत्पादक कंपन्यांच्या वार्षिक अहवालावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. आफ्रिकन देशामध्ये ही संस्था काम करते.
श्रीमंत देशांनाच लस पुरवठा
कोरोनाचा कहर जगभर सुरू होता. त्यामुळे लसींची गरज सर्वच देशांना आहे; पण फायझर, मॉडेर्ना आणि बायोएनटेक या तीन कंपन्यांनी जादा नफा कमविण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्ससारख्या श्रीमंत देशांनाच लस पुरवठा केला, असे अहवालात म्हटले आहे. मॉडेर्नाने केवळ 0.2 टक्के लस पुरवठा गरीब देशांना केला. या तीन कंपन्यांचा एकत्रित नफा प्रति सेकंद एक हजार डॉलर्स तर प्रति दिवसाला 9 कोटी 35 लाख डॉलर्स इतका आहे.




























































