
नवीन वर्षाची सुरुवातच चांगली होणार आहे. कोरोना लसीची ‘ड्राय रन‘ अर्थात रंगीत तालीम शनिवारी (दि. 2) होणार आहे. महाराष्ट्रासह देशभरात होणारी रंगीत तालीम महत्त्वपूर्ण असणार आहे.
2020 हे वर्ष कोरोनाग्रस्त होते. मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी झाली. लॉकडाऊन करावा लागला आणि त्याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला. मात्र, 2021 हे वर्ष दिलासादायक असेल अशी आशा आहे. कोरोनावरील लसींची अंतिम मानवी चाचणी झालेली आहे. त्यामुळे नवीन वर्षात लसीकरणाला सुरुवात होईल. परंतु मोठय़ा प्रमाणावर लसीकरण सुरू करण्यापूर्वीची तयारी पाहण्यासाठी ‘ड्राय रन’ अर्थात रंगीत तालीम घेणे आवश्यक आहे. 2 जानेवरीला महाराष्ट्रासह देशभरात ही रंगीत तालीम होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. आज केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आणि लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यापूर्वी 28 आणि 29 डिसेंबरला केवळ चार राज्यांमध्ये ड्राय रन झाली होती.
अशी होणार रंगीत तालीम
शनिवारी (दि. 2) सर्व राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशातील राजधानीच्या शहरांमध्ये रंगीत तालीम होईल. किमान तीन ठिकाणी ही तालीम घेतली जाईल.
महाराष्ट्र आणि केरळ राज्यात राजधानीबरोबरच इतर महत्त्वाच्या शहरांमध्येही लसीकरणाची रंगीत तालीम होण्याची शक्यता आहे.
लसीकरणासाठी CO-WIN हे ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. रंगीत तालीमवेळी या ऍप्लिकेशनचा वापर होईल.
प्रत्यक्ष लसीकरण करताना कोणत्या अडचणी येऊ शकतात हे या रंगीत तालमीत स्पष्ट होईल.





























































