
देशातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली असल्याने दुसरी लाट ओसरायला लागली असल्याचं बोललं जात आहे. कोरोनाच्या पुढच्या लाटा थोपवण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. यामुळे केंद्रासह राज्य सरकारांनी लसीकरण वेगात व्हावं यासाठी कंबर कसली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये झपाट्याने वाढलेल्या रुग्णसंख्येने आरोग्ययंत्रणेवर प्रचंड ताण आला होता. तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होण्यासाठी ही यंत्रणा अधिक मजबूत करण्यासोबतच वेगाने लसीकरण मोहीम राबवण्याची गरज डॉक्टरांनी आणि तज्ज्ञमंडळींनी व्यक्त केली आहे.
ज्या भागांमध्ये अधिक लसीकरण होईल ते भाग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अधिक सुरक्षित असतील असं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर लस घेतलेल्या लोकांच्या मनात सध्या एक प्रश्न निर्माण झाला आहे की लस घेतल्यानंतर त्याचा प्रभाव किती महिने टीकतो ? तज्ज्ञ मंडळी याबाबत विविध मते व्यक्त करत आहेत. काही डॉक्टरांचं म्हणणं आहे की लसीचा प्रभाव 3 ते 6 महिने राहील. अहमदाबादमधील डॉक्टर भरत गढवी यांनी म्हटलंय की लस घेतलेल्या व्यक्तीला किती दिवस सुरक्षाकवच प्राप्त होईल हे सांगता येत नाही, कारण लस घेतल्यानंतरही काहींना कोरोनाची लागण झाली आहे. देशात अशीही काही उदाहरणे पाहायला मिळाली आहेत, ज्यात दोन डोस घेतलेल्या व्यक्तीलाही कोरोना झाला आहे. डॉ.गढवी यांनी म्हटलंय की लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही लोकांनी मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
डॉ.तुषार पटेल यांनी लसीच्या प्रभावाबद्दल बोलताना म्हटलंय की कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत कोरोनापासून संरक्षण मिळू शकते. कोरोनापासून अधिक संरक्षण मिळवण्यासाठी बूस्टर डोसचीही गरज भासू शकते. डॉ.किर्ती गढवी यांनी नवभारत टाईम्सशी बोलताना सांगितले की दोन्ही डोस घेतल्यानंतर जर कोरोनाने त्याचे रुप बदलले तर लस घेतलेली व्यक्तीही बाधित होऊ शकते. मात्र दोन्ही डोस घेतले असल्याने कोरोनाचा प्रभाव कमी होतो. डॉ.जे.व्ही.मोदी यांनी नवभारत टाईम्सला सांगितले की कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतल्याने 6 ते 12 महिन्यांपर्यंत कोरोनापासून संरक्षण मिळू शकतं.
फायझर-बायोअनटेकने केलेल्या अभ्यासात दिसून आलं आहे की लस घेतलेल्या व्यक्तीला कोरोनापासून 6 महिन्यांपर्यंत संरक्षण मिळू शकतं. काही लसींमुळे हे संरक्षण 1 वर्षापर्यंतही मिळू शकतं. भारत बायोटेकची लस कोवॅक्सिन घेतलेल्या व्यक्तींच्या शरीरात 6 महिने ते 1 वर्षापर्यंत अँटीबॉडी राहू शकतात



























































