कोरोना झाल्याचे सांगत आत्महत्येचा बनाव केला, बायको सोडून दादला प्रेयसीकडे पळाला

कोरोना महामारीचा गैरफायदा घेत स्वत:चा मृत्यू झाला आहे, असे भासवून प्रेयसीसोबत इंदूर इथे नव्याने संसार थाटलेल्या विवाहीत तरुणाचे वाशी पोलिसांनी पितळ उघडे पाडले. एखाद्या हिंदी चित्रपटातील कथानकाप्रमाणे या तरुणाने आत्महत्येचा बनाव केला. मात्र पोलिसांनी थेट इंदूपमध्ये जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला पुन्हा पत्नीच्या ताब्यात दिले.

आपली पत्नी आणि 5 वर्षांच्या मुलीसह तळोजा इथे राहणारा मनीष सुनीलचंद्र मिश्रा हा 24 जुलै रोजी नेहमीप्रमाणे जेएनपीटी इथे कामावर गेला होता. रात्री 8 वाजता त्याने बायकोला फोन करून मी वाशीमध्ये एका लॅबबाहेर उभा आहे, माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. आता मी काय जगणार नाही. फार त्रास होतोय, मी आता जिवाचे बरेवाईट करतो, असे मोठ्याने रडत फोनवर सांगितले. पत्नी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असताना त्याने फोन स्विच ऑफ केला. त्याचे कुटुंब त्याचा शोध घेत दुसऱ्या दिवशी त्याची मोटरसायकल वाशी येथे सायन-पनवेल महामार्गावर सापडली. घडलेला प्रकार कुटुंबियांनी वाशी पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांनी मनीषचा शोध सुरू केला.

मनीषने आत्महत्या केली काय हे जाणून घेण्यासाठी वाशी खाडीचा परिसर पिंजून काढण्यात आला. मात्र त्यातून कोणताही सुगावा लागला नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी मनीषचे मोबाईल लोकेशन इचानक इंदूरमध्ये दिसले. त्यानंतर पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक इंदूरला गेले आणि त्यांनी मनीषला ताब्यात घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या