ठाणे, भिवंडी, रायगडात स्वतंत्र विलगीकरण कक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परदेशातून मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांसाठी ठाणे, भिवंडी तसेच रायगड जिह्यात स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. विमानतळावरून या कक्षात नेण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे देण्यात आली असून त्यात हयगय करणाऱ्या कॉरेन्टाईन सेल प्रमुखावर कडक कारवाई करण्याचा इशारा  कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी दिला आहे.

दौंड यांनी आज रात्री उशिरा ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी जिह्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संपर्क साधला. तसेच परदेशातून आलेल्याचे काय करायचे याबाबत मार्गदर्शन केले. कासारवडवली येथे 600, भिवंडीत 3000 तर रायगड जिह्यात 2053  विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.

मंत्रालयातील शासकीय बैठकांवरही आता निर्बंध

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच इतर कार्यालयांनी बैठका आयोजित करू नयेत असे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहेत.

हायकोर्टाचे कामकाज आठवडय़ात केवळ दोन दिवस

मुंबई  उच्च न्यायालयाने खबरदारी म्हणून नियमित कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ापासून मुंबई, नागपूर, संभाजीनगर आणि गोवा खंडपीठाचे कामकाज आठवडय़ातून केवळ दोन दिवस चालणार आहे. पुढील आठवडय़ात 23 आणि आणि 26 मार्च रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत हायकोर्टात तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.

सरकारी कार्यालयांतील ‘एसी’ बंद

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्यातील सर्वच  शासकीय कार्यालयांनी वातानुकूलित यंत्रणेचा शक्यतो वापर टाळावा, अशा सूचना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी राज्य सरकारच्या सर्व विभागांना दिल्या आहेत.

विद्यापीठाचा परीक्षा विभाग बंद

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरीतील महात्मा फुले भवन येथील परीक्षा विभाग 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा विभागाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

एमसीएची सीईटी 30 एप्रिलला 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने 28 मार्च रोजी घेण्यात येणारी पदव्युत्तर संगणक प्रवेश (एमसीए) सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता 30 एप्रिल रोजी होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.

विडी-तंबाखू व्यापारी संघाचा दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय

मुंबईसह राज्यातील किरकोळ वस्तू विक्रेत्यांना 31 मार्चपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई विडी-तंबाखू व्यापारी संघाच्या वतीने संघाचे कार्याध्यक्ष नंदकुमार हेगिष्टे, सेक्रेटरी अतुल नारकर यांनी केले आहे.