आज तुम्ही मला खोटं ठरवलंत! अभिनेत्याने मागितली उद्धव ठाकरेंची माफी

27296

कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी संपूर्ण जग झुंजतं आहे. हिंदुस्थानातही या जीवघेण्या आजाराशी लढा सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये या आजाराशी मुकाबला करण्यासाठी ज्या पद्धतीने पावले उचलली जात आहेत त्यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. खासकरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली आहे त्याचं विशेष कौतुक केलं जात आहे. संयमीपणाने आणि अत्यंत धीराने ते महाराष्ट्राला कोरोनापासून जितकं शक्य होईल तितकं लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. घाबरलेल्या जनतेला ते विविध प्रकारे दिलासा देण्याचं ते काम करीत आहे आणि आश्वासितही करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या याच गुणामुळे आणि कौशल्यामुळे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनीही त्यांचं कौतुक करायला सुरुवात केली आहे. एका अभिनेत्याने फेसबुकवर पोस्ट लिहून मुख्यमंत्र्यांची माफी मागितली आहे.

kiran-mane13

अभिनेते किरण माने यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये काय लिहिलं आहे ते वाचा.

सॉरी उद्धवजी.. मी किरण माने. मला तुमची माफी मागायचीय.

तुम्ही पूर्वीच्या सरकारमध्ये असताना तुमची हतबलता पाहुन खूप टीका केली होती तुमच्यावर ! कणा नसलेला नेता.. ताटाखालचं मांजर म्हणायचो… भाजपासोबत झालेली तुमची फरपट पाहून ‘शिवसेनेचा कणखरपणा बाळासाहेबांबरोबर गेला’ असं मला वाटायचं.

आज तुम्ही मला खोटं ठरवलंत.
खूप कमी माणसं अशी असतात, जी तुम्हाला चकीत करून टाकतात ! आधी तुमच्या मनात इमेज डागाळलेली असते… अशा काही घटना घडतात की तोच माणूस विजेसारखा लखलखून तुमचे डोळे दिपवून टाकतो !

ऊद्धवजी तुम्ही आज आम्हाला दिपवून टाकताय. आज अत्यंत कठीण परीस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राला दिलासा देणारं एकमेव कोण असेल तर ते तुम्ही आहात. खालच्या पट्टीत अत्यंत शांत संयमी बोलणं.. मुद्देसूद-थेट बोलणं..सद्यपरीस्थितीबद्दल सतत ‘फॅक्च्यूअल डेटा’ देणं.. बोलताना ‘अनावश्यक पाल्हाळ’ आणि ‘डायलाॅगबाजी’ टाळणं… खरंच चकीत होतोय रोज !

‘लाॅकडाऊन’चा निर्णय खूप आधी आणि योग्य वेळेत घेतला होतात तुम्ही… तो ही थेट प्रशासनामार्फत नोटीस देऊन. लगोलग. ‘टीझर-प्रोमो-अॅड-मार्केटिंग आणि मग पिच्चर’ अशा फिल्मी गोष्टींत तुम्ही वेळ घालवत बसत नाही. खटक्यावर बोट जागेवर पलटी.. मानलं तुम्हाला ! कालच ‘मास्क’स् चा खूप मोठा, जवळजवळ दोन कोटी रूपये किमतीचा बेकायदा साठा पोलीसांनी पकडणं – विनाकारण बाहेर फिरणार्‍यांना दंडुक्याचा प्रसाद देऊन घरी पाठवणं – माझं घर सातार्‍यात अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. शांत एरीया. तिथपर्यन्तसुद्धा रोज रात्रंदिवस पोलीसांनी गस्त घालणं.. इतकी ‘एफिशियन्सी’ आम्ही आयुष्यात पहिल्यांदा अनुभवतोय. संपूर्ण प्रशासन हललंय. खूप आधार वाटतोय. कठीण काळात तुमच्यासारखं अत्यंत प्रगल्भ नेतृत्त्व लाभणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे ! या काळातलं तुमचं काम सुवर्णाक्षरांनी लिहीलं जाणार आहे. पुढच्या पिढ्या तुम्हाला सलाम करणारेत !!!

धन्यवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे…मन:पूर्वक धन्यवाद !

– किरण माने

साॅरी उद्धवजी.. मी किरण माने. मला तुमची माफी मागायचीय.
तुम्ही पूर्वीच्या सरकारमध्ये असताना तुमची हतबलता पाहुन खूप टीका…

Posted by Kiran Mane on Tuesday, March 24, 2020

आपली प्रतिक्रिया द्या