कोरोनाच्या दोन वर्षांनंतर शाळांमध्ये रंगणार क्रीडा स्पर्धा

कोरोनानंतर पहिल्यांदाच 15 डिसेंबरपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहेत. शाळा, केंद्र, बीट, तालुका व जिल्हा असे एकूण पाच स्तरांवर या स्पर्धा होणार आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे ही स्पर्धा होऊ शकली नक्हती. विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने कोरोनानंतर पहिल्यांदाच शाळांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा घ्यायला मान्यता दिली आहे. शालेय स्तरावरूनच विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी, हा त्यामागील हेतू असतो.

सोलापूर जिह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार 795 शाळा असून, त्याअंतर्गत दोन लाख 11 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यास त्याच्या आवडीनुसार क्रीडा प्रकार निश्चित करून स्पर्धेत भाग घेता येणार आहे. कोरोनाकाळात शाळा बंद, मुले घरी आणि ऑनलाइन शिक्षण, याचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. लठ्ठपणा, दृष्टिदोष, चिडचिडेपणा वाढल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात असून, पालकांनी आपल्या मुलांना क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

शाळा स्तरावर 15, 16 डिसेंबर, केंद्र स्तरावर 20 क 21 डिसेंबर, बीट स्तरावर 26, 27 डिसेंबर आणि तालुका स्तरावरील स्पर्धा 30 क 31 डिसेंबर या काळात होतील. शेवटी 1 ते 15 जानेवारी या काळात जिल्हा स्तरावरील क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत. त्यासंबंधीचे नियोजन सर्व मुख्याध्यापकांना पाठविले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडतील.

विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक आठवडय़ातील चार तासिका खेळाच्या घ्यायला हव्यात. विद्यार्थ्यांची खिलाडू वृत्ती जोपासली जावी, सांघिक भावनांची जाणीव व्हावी आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, या हेतूने प्रत्येक शाळेने दररोज किंवा आठवडय़ातील चार तासिका खेळासाठी द्याव्यात. प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी त्यासंबंधीचे निर्देश शाळांना दिले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली 15 डिसेंबर 2022 ते 15 जानेवारी 2023 या काळात प्रत्येक जिल्हा परिषद शाळांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. यंदा जिल्हा स्तरावरील स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी 100 रुपयांचा प्रवास खर्च दिला जाणार आहे. त्या विद्यार्थ्यांना यंदा नाश्त्याऐवजी जेवण मिळणार आहे.

– संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद.